महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जानेवारी ।। Pune Winter: गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होऊन पुण्यासह राज्यात थंडीचे आगमन झाले होते; परंतु, रविवारी (ता. ५) किमान तापमानात किंचित वाढ झाली. पुढील दोन दिवस पुण्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून गायब झालेली थंडी शनिवारी (ता. ४) पुन्हा परतल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा घसरला होता; परंतु रविवारी राज्यात २ ते ३ अंश सेल्सिअस किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून आले. नागपुरात तापमान ८.८ अंश सेल्सिअसवर आले
असून, ते राज्यातील सर्वांत कमी तापमान ठरले, तर पुण्यात ११.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविले गेले आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता थोडी कमी झाली आहे. गोव्यासह कोकण व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पुणे आणि परिसरामध्ये आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ असेल, तर सकाळी विरळ धुके पडण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता. ६) किमान तापमान ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान, तर कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.