Vande Bharat Express: पुण्याला मिळणार आणखी ४ वंदे भारत ; कुठून कुठपर्यंत धावणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ जानेवारी ।। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातून आता ४ नव्या वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. सध्या पुण्यातून २ वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. येत्या काही दिवसांत पुणेकरांच्या सेवेमध्ये एकूण ६ वंदे भारत एक्स्प्रेस येणार आहेत. प्रवासाचा कालावधी कमी व्हावा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकारक व्हावा या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने पुण्याहून आणखी ४ वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

२८ डिसेंबर २००४ रोजी रेल्वे प्रशासनाने पुण्याहून ४ नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत घोषणा केली होती. या घोषणेनंतर पुण्यातील एकूण वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या ६ होईल. या नव्या ४ वंदे भारत एक्स्प्रेसमुळे आणखी ४ नवी शहरं पुण्याच्या जवळ येणार आहेत. पुणेकरांना जलद आणि अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देत कनेक्टिव्हिटीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा या उपक्रमाचा उद्देश असणार आहे.

पुण्यामध्ये सध्या दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. पुणे-हुबळी, पुणे-कोल्हापूर या २ वंदे भारत एक्स्प्रेस धावतात. त्याचसोबत मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस पुणे मार्गे चालवण्यात येते. चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याला जोडण्यात येणार असल्यामुळे इतर अनेक गंतव्यस्थानांच्या प्रवासाचा वेळ कमी होईल ज्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळेल.

पुण्यातून नव्याने धावणार असणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस कुठपर्यंत असणार आहे याची माहिती समोर आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच पुणे-शेगाव, पुणे-वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगाव या मार्गांवर धावतील. या वंदे भारत एक्स्प्रेस नेमक्या कधीपासून सुरू करण्यात येणार याच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आल्या नाही. पण ही सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या नव्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे पुणेकरांना चांगलाच फायदा होणार आहे.

सध्या पुण्यातून धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांच्या तिकिटांच्या किमती मार्ग आणि कोचच्या प्रकारावर अवलंबून आहेत. म्हणजेच, पुणे-कोल्हापूर मार्गावर एका स्टँडर्ड सीटसाठी ५६० रुपये मोजावे लागतात. तर विशेष कोचच्या तिकिटाची किंमत १,१३५ रुपये आहे. ही ट्रेन आठवड्यातून तीन वेळा बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावते. पुणे-हुबळी मार्गावर स्टँडर्ड सीटसाठी १,५३० रुपये आणि स्पेशल कोचसाठी २,७८० रुपये मोजावे लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *