महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जानेवारी ।। भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला ३-१ ने पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेतील विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला.
आता ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघातून कर्णधार पॅट कमिन्सला वगळण्यात आलं आहे. तर स्टीव्ह स्मिथकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपदाची जबाबदारी
ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. या मालिकेसाठी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथकडे सोपवण्यात आली आहे. तर ट्रेविस हेडकडे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मालिकेसाठी मॅकस्विनीला संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं होतं. आता श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे.
यासह भारतीय संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत स्कॉट बोलँडच्या गोलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. आता श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही तो वेगवान गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करताना दिसेल. यासह मिचेल स्टार्क आणि शॉन अबॉटला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. सिडनी कसोटीत पदार्पण करणाऱ्या ब्यू वेबस्टरला देखील या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं आहे.
श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ:
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, अॅलेक्स केरी, कूपर कॉनॉली, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, नॅथन मॅकस्विनी, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.
