Buldhana Virus : टक्कल व्हायरस बाधित वाढले, शेगावमध्ये घबराट ; केसगळती कशी थांबणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जानेवारी ।। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजनाथ, घुई या गावांमध्ये टक्कल पडणाऱ्यांची संख्या आता ५१ वर पोहोचली आहे. वाढत्या तक्रारींची दखल घेत शेगाव तालुक्यात आरोग्य विभागाकडून घरोघरी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्वचारोग तज्ञांचे पथकही दाखल झाले असून प्रथम कठोरा, बोंडगाव, हिंगणा या गावात तपासणी सुरु केली आहे. फंगल इन्फेक्शनचा हा प्रकार असल्याचे मत तज्ञांनी प्रथमदर्शनी व्यक्त केले.

पाणी आणि त्वचेचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. अहवाल प्राप्त होताच नेमके कारण पुढे येईल.

भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत बोंडगाव येथे गावातील महिला, पुरुष, लहान मुलामुलींचे केस गळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे गावातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेंगोळे, बोडगावचे सरपंच रामेश्वर धारकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्वेक्षण करण्यात आले.

आरोग्य सहाय्यक तायडे, आरोग्य सेवक मोहम्मद शाहिद, आशा स्वयंसेविका थारकर यांनीही सहभाग घेतला. त्यानंतर ग्राम कठोरा येथे केस गळती झालेल्या रुग्णांचे सर्वेक्षण करून आरोग्य प्रशिक्षण देण्यात आले. उपस्थित डॉक्टर राठोड, डॉक्टर ढोबळे यांनी केस गळती संदर्भात गावकऱ्यांच्या शंका कुशंकाचे निराकरण केले. शॅम्पू लावल्याने, खाऱ्या पाण्यात केस धुतल्याने केस गळती झाल्याचे गावकरी बोलत आहेत.

अज्ञात रोगाच्या थैमानाने तीनही गावात भीतीदायक वातावरण तयार झाले आहे. त्यावर सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा शिंदेसेना तालुकाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी शेगाव तालुका आरोग्य अधिकारी दिपाली बायस्कर तसेच साथरोग अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश कुंडकर यांच्याशी चर्चा करून केस गळती प्रकरणी माहिती दिली.

केस गळून टक्कल पडणे, हा प्रकार फंगल इन्फेक्शनचा असल्याचे प्रथमदर्शित समजते. शाम्पू किंवा पाण्यामुळे केस जात असल्याची भीती बाळगू नये, केस गळून टक्कल पडत असले तरी लवकर त्यावर केस येणे सुरू झाल्याचे आठ जानेवारीला चर्मरोग तज्ञांच्या पथकाच्या सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

संसर्ग झालेल्या गावातील पाणी नमुने जैविक व रसायनिक तपासणीसाठी 7 जानेवारीला पाठवण्यात आले आहे. याशिवाय सात नागरिकांच्या स्कीन तपासणीसाठी नमुने घेण्यात आले ते अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. प्राथमिक तपासणी फंगल संसर्गामुळे केस गळती होत असल्याची शक्यता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी घाबरू नये
नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, शेगाव तालुक्यात तज्ञ डॉक्टरांकडून सर्वे सुरू असल्याची माहिती घेतली असून. यावर उपाययोजना ही करण्यात येतील असे या भागाचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले. यापूर्वी केस गळतीचा प्रकार घडत नसल्याचे सरपंच राजश्री लक्ष्मण गवई यांनी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *