Tirupati Stampede: तिरुपती मंदिरात टोकन काढताना चेंगराचेंगरी, सात भाविकांचा मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जानेवारी ।। तिरुपतीमधील विष्णू निवासमजवळ चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 7 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. तिरुपती येथील विष्णू निवासम येथे वैकुंठ द्वार सर्व दर्शन टोकन वाटप सुरू असताना हा चेंगराचेंगरी झाल्याची घटना बुधवारी घडली. वैकुंठ द्वार हे तिरुमलामधील एक विशेष प्रवेशद्वार आहे जे गर्भगृहाला वेढलेले आहे. हे फक्त वैकुंठ एकादशीला उघडले जाते. या दिवशी जो कोणी या ‘वैकुंठ द्वारम’ मधून जातो त्याला वैकुंठाची प्राप्ती होते असे मानले जाते. IANS नुसार, गुरुवारी सकाळी वैकुंठ द्वार दर्शनाची तिकिटे काढण्यासाठी तीन ठिकाणं होती. तिथेच ही घटना घडली. विशेष दर्शन तिकिटासाठी भाविक मोठ्या संख्येने रांगेत उभे राहिल्याने चेंगराचेंगरी झाली . या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. इतर काही जण जखमी झाले असून त्यांना श्री व्यंकटेश्वर रामनारायण रुईया शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

4,000 लोक होते टोकनसाठी रांगेत
टोकनसाठी जवळजवळ 4 हजार भाविक रांगेत उभे होते, असे सांगण्यात येत आहे. तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम्स (TTD) ने गुरुवारी पहाटे 5 वाजल्यापासून तिरुपतीमधील नऊ ठिकाणी 94 काउंटरवर विशेष दर्शन तिकिटे जारी केली जातील अशी घोषणा केली होती. मात्र, बुधवारी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली. भाविकांना प्रवेश दिल्याने काउंटरवर गोंधळ उडाला. एकमेकांना ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने चेंगराचेंगरी झाली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासम, बैरागीपट्टेडा आणि सत्यनारायणपुरममध्ये चेंगराचेंगरी झाली. पोलीस आणि टीटीडीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. टीटीडी 10, 11 आणि 12 जानेवारी रोजी वैकुंठ द्वार दर्शनासाठी गुरुवारी सकाळी 1.20 लाख टोकन जारी करण्याचा विचार करत होते.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू जाणार तिरुपतीला
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गुरुवारी सकाळी 10.30 वाजता तिरुपतीला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री रुग्णालयाला भेट देतील आणि त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी टीटीडी अध्यक्षांना दिले.

हताश कुटुंबातील सदस्य घेत आहेत त्यांच्या प्रियजनांचा शोध
पोलीस घटनास्थळी हजर असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. अनेक अजूनही बेपत्ता असून त्यांचे कुटुंबीय शोध घेत आहेत. एका व्हिडीओमध्ये कुटुंबीय पोलिसांशी वाद घालताना आणि त्यांच्याकडे जाब विचारताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *