महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जानेवारी ।। देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढण्यास सुरु झाली असून, आग्नेयेसह उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींनीसुद्धा देशातील बहुतांश भागांवर परिणाम करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी मागील काही तासांपासून विदर्भासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला.
कोकण किनारपट्टी क्षेत्र आणि मुंबई मात्र या थंडीपासून काही अंशी वंचितच असल्याचं पाहायला मिळत आहे. पहाटेची वेळ आणि दिवस मावळतीला गेल्यानंतर तापमानात होणारी घट वगळता शहरासह राज्यातील किनारपट्टी भागामध्ये हवेत आर्द्रतेचं प्रमाण अधिक राहणार असून, उष्मा जाणवणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तर, उन्हाचा दाह आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिल्यानं या सततच्या हवामान बदलांनी नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.
इथं मुंबईत काही फारशी थंडी नसली तरीही राज्याच्या उत्तर क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये मात्र थंडीचा कडाका वाढत असून, तापमानात पुन्हा लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. धुळ्यामध्ये राज्यातील सर्वाधिक निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, इथं आकडा 4.4 अंशांवर पोहोचला आहे. पुढील 24 तासांमध्ये हा आकडा फारसा बदलणार नसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सध्या पश्चिमी झंझावात सक्रिय असल्यामुळं उत्तरेकडील काही राज्यांच्या मैदानी भागांमध्ये पावसानं हजेरी लावली असली तरीही पर्वतीय क्षेत्रांमध्ये मात्र बर्फवृष्टी सुरूच आहे. ज्यामुळं एकंदरच तापमानात घट नोंदवली जात आहे. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान इथंही या थंडीनं जोर धरल्याचं स्पष्ट होत आहे.
पावसासाठी तयार राहा…
राज्यात थंडीनं पकड मजबूत केली असतानाच शुक्रवारनंतर मात्र पावसासाठी पोषक हवामान निर्मितीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि नदीकच्या भागांमध्ये दरम्यानच्या काळात पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, राज्याच्या उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरणाचाही अंदाज आहे.