महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ जानेवारी ।। पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून एक लाख रुपयांहून अधिक थकबाकी असणार्या थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्तांवर जप्ती कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. त्या मालमत्ता सील करून जप्त करण्यात येत आहेत. थकबाकीदांच्या दरवाज्यासमोर बॅण्ड वाजविला जाणार आहे. तसेच, त्यांची नावे वृत्तपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहेत.
एक लाखाहून अधिक थकबाकी असणार्यांमध्ये खासगी संस्था, खासगी शाळा व महाविद्यालये, हॉटेल, खासगी रुग्णालये, पेट्रोल पंप, औद्योगिक कारखाने, शो रुम, मंगल कार्यालय, बँका, मॉल, चित्रपटगृहे आदींचा समावेश आहे. थकबाकीदारांच्या नावांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिध्द केली जाणार आहे. थकबाकीदारांना आवाहन करण्यासाठी त्या आस्थापनांच्या बाहेर बॅण्ड पथकाकडून बॅण्ड वाजविण्यात येणार आहे. याबरोबर सदर मालमत्तांवर चालू स्थितीमध्येसुध्दा जप्ती करण्याचे आदेश करसंकलन विभागाकडून देण्यात आले आहे. तसेच, मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.
करसंकलन विभागाच्या पथकांनी मंगळवार (दि.7) पर्यंत तब्बल 418 मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडे तब्बल 11 कोटी 37 लाख 23 हजार 198 रुपयांचा मालमत्ताकर थकीत आहे. मालमत्ता जप्ती कारवाईच्या वेळेस 1 हजार 511 मालमत्तांनी एकूण 26 कोटी 92 लाख 73 हजार 749 रुपयांचा भरणा केला आहे.