राष्ट्रवादीची मुन्नी कोण ? प्रश्नावर अजित पवार म्हणाले …’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जानेवारी ।। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या हत्या प्रकरणात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणावरुन भाजपाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी सातत्याने पाठपुरावा करत आरोपींना फाशीची शिक्षा केली जावी अशी मागणी केली आहे. धस यांनी या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या संपत्तींबद्दल खुलासा करणाऱ्या धस यांनी सूचक वक्तव्यामधून ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील मुन्नी’ असा उल्लेख करत विधान केलं आहे. यावरुन अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी संतापून पत्रकारांना उत्तर दिलं.

सुरेश धस नेमकं काय म्हणाले होते?
सुरेश धस यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि सुरज चव्हाण सातत्याने तुमच्यावर टीका करत आहेत, असं म्हणत प्रश्न विचारण्यात आलेला. या प्रश्नावर उत्तर देताना धस यांनी मुन्नीचा उल्लेख केला होता. “राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा तू इथे ये. मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहिती आहे आणि मुन्नीला माहिती आहे, मी कोणाबद्दल बोलत आहे,” असं धस म्हणाले. यावरुन ही मुन्नी कोण याबद्दल उलटसुटल चर्चा सुरु झाल्या.

अजित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादीतील ती मुन्नी कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालेली असतानाच गुरुवारी अजित पवारांना यावरुनच प्रश्न विचारण्यात आलं. सुरेश धसांच्या मुन्नी विधानानावरुन प्रश्न विचारला असता अजित पवार चांगलेच संतापल्याचं दिसून आलं. सुरेश धस यांनी बडी मुन्नीचा उल्लेख केला, बडी मुन्नी कोण? असं पत्रकारांनी विचारताच अजित पवार संतापले. त्यांनी चिडक्या स्वरातच, “बडी मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा. कुणी फालतू गोष्टी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणारा आहे,” असं उत्तर दिलं. पुढे बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी, “त्याला (सुरेश धस यांना) विचारा तो कुणाबद्दल बोलतो आहे.” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी नोंदवल्याचं पाहयला मिळालं.

धस म्हणतात मुन्नी ही महिला नाही
दरम्यान, धस यांनी राष्ट्रवादीमधील मुन्नी ही कोणी महिला नसून पुरुष असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसात सगळं समोर येईल असंही ते म्हणाले. धस यांच्या स्पष्टीकरणानंतर ही मुन्नी म्हणजे नेमकं कोण याबद्दल पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *