महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जानेवारी ।। सोने-चांदीच्या किमतीत सतत वाढ होत असून ही दरवाढ थांबवण्याचं नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा पिवळ्या धातूंच्या किमती वाढल्या आहेत. गुरुवारी सोन्याने ८० हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर चांदीच्याही दरात वाढ झाली आहे. चांदीच्या भावाने किलोमागे ९२ हजार रुपयांचा आकडा पार केला आहे.
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार, गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ३०० रुपयांनी वाढला आहे. वाढलेल्या दरानंतर सोन्याचा भाव ८०,३०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला आहे. बुधवारी सोन्याचा भाव ८० हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र गुरुवारी पुन्हा सोने दरात ३०० रुपयांची वाढ होत तो दर ८० हजार ३०० रुपये प्रति तोळा या किमतीवर बंद झाला आहे.
चांदीचा भाव काय?
गुरुवारी सोने दराप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ झाली. चांदीचा भाव ५०० रुपयांनी वाढून तब्बल ९३ हजार रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. एक दिवस आधी अर्थात बुधवारी देखील चांदीच्या किमती वाढल्या होत्या. बुधवारीही चांदीचा भाव ५०० रुपयांनी वधारला होता. बुधवारच्या किमतीसह चांदीने ९२५०० रुपये प्रति किलोग्रॅमचा दर ओलांडला होता. त्यानंतर गुरुवारी पुन्हा ५०० रुपयांची दरवाढ झाल्याने चांदीचा दर ९३००० रुपये झाला.
एमसीएक्सवरही भाव वाढले
एमसीएक्स अर्थात मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवरही सोने आणि चांदीचे दर वाढले आहेत. एमसीएक्सवर वायदे बाजारात फेब्रुवारी डिलीव्हरी सोने दर २७४ रुपयांनी वाढून ७७९९४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर वायदे बाजारात मार्च डिलीव्हरी चांदी ५९३ रुपयांनी वाढून ९१५३१ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.