महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जानेवारी ।। भारताचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून हवी तशी कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना सुनील गावसकर यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे.
सुनील गावसकरांच्या मते, रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होऊ शकतो. नुकताच पार पडलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत बुमराह चमकला होता. त्याने गोलंदाजी करताना ३२ गडी बाद केले होते.
यासह तो मालिकावीर ठरला होता. सुनील गावसकरांच्या मते जसप्रीत बुमराह भारतीय कसोटी संघाचा पुढील कर्णधार होऊ शकतो. बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने पर्थ कसोटी सामना जिंकला होता.
सुनील गावसकर यांनी चॅनल ७ वर चर्चा करताना म्हटले की, ‘ तो ( जसप्रीत बुमराह) भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होऊ शकतो. तो संघाची जबाबदारी घेऊन नेतृत्व करतो. त्याच्यात नेतृत्वाचे गुण आहेत. तो असा खेळाडू आहे, जो गरज नसताना तुमच्यावर दबाव टाकणार नाही. कधी कधी असे कर्णधार असतात, जे गरज नसताना खूप दबाव टाकतात. ज्याला जे काम दिलं गेलय त्याने तेच करावं, इतकीच अपेक्षा बुमराहला असते. प्रत्येक खेळाडूला आपला रोल माहीत असतो, त्याने तेच काम करावं. त्यासाठी बुमराह कुठलाही दबाव टाकत नाही.’
जसप्रीत बुमराह भारतीय संघातील दिग्गज गोलंदाज आहे. त्याने शानदार गोलंदाजी करून भारतीय संघाला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराजसारखे गोलंदाज घडले आहेत. गावसकर म्हणाले, ‘ जसप्रीत बुमराह मिड ऑफ किंवा मिड ऑनला उभा राहतो. तो तिथे असणं हे गोलंदाजांसाठी फायदेशीर आहे.