Hair Loss Reason: बुलडाण्यातल्या टक्कल व्हायरसचं सिक्रेट आलं समोर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जानेवारी ।। तालुक्यातील कालवड, बोंडगांव, कठोरा, भोनगांव यासह एकूण अकरा गावांमधील ग्रामस्थांमध्ये मागील काही दिवसांपासून केसगळतीच्या समस्या आढळून आली आहे. तीन दिवसांतच नागरिकांचे टक्कल पडल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली. या अकरा गावांमधील १०० रुग्ण केसगळतीने बाधित असल्याचे आढळून आले, अशी माहिती शेगावचे तहसीलदार दीपक बाजड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवली आहे.

या गावातील पाण्याचे नमुन्याच्या तपासणीत पाण्यामधील नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे केस गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तालुक्यातील ११ गावांमध्ये आतापर्यंत १०० केस गळतीचे रुग्ण आढळून आले आहे. याबाबत, तसेच या गावांमधील पाण्याच्या स्त्रोतांबाबतची माहिती सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदारांनी सादर केली आहे. सदर गावांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

तसेच आरोग्य विभागामार्फत सदर ग्रामस्थांची तपासणी करून त्यांच्या रक्तांचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. सदर गांवाचे सरपंच, ग्रामसेवक, तालुका आरोग्य अधिकारी यांचे सोबत समन्वय ठेवण्यात येत असल्याचे तहसीलदांनी कळवले आहे.

तालुक्यातील केस गळतीच्या आजारामुळे मोठी खळबळ निर्माण झाली आहे. त्यामुळे ८ जानेवारी रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या सह जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी, त्वचारोग तज्ज्ञ, आयडीएसपी चमू, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित गांवाना भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत शेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली भायेकर व संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. सदर गांवामधील पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. वरील नागरिकांपैकी ०७ नागरिकांची त्वचा बायोप्सी चाचणीसाठी अकोला येथील शासकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात आले होते. त्वचारोग तज्ज्ञ यांनी रुग्णांची पाहणी करून प्राथमिक निदान फंगल इन्फेक्शन असू शकते व त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लक्षणे पाहून उपचार सुरू केले.

दरम्यान पाठवलेले तपासणी अहवाल प्राप्त झाल्यावर त्यामध्ये या गावांमधील पाण्यात नायट्रेट प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. त्यामुळे केस गळती झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शेगाव तालुक्यातील बाधित गावांसोबतच इतरही काही गावांमध्ये, तसेच लगतच्या संग्रामपूर तालुक्यातील लगतच्या गावात सुद्धा तपासणी करण्यात आली आहे.

या गावांमध्ये सापडले रुग्ण
गाव – रुग्णसंख्या

बोंडगाव १९

कालवड १५

कठोरा ८

भोनगाव ४

मच्छिंद्रखेड ५

हिंगणा वैज ६

घुई ८

तरोडा कसबा १०

पहुरजिरा १२

माटरगाव बु. ८

निंबी ५

एकूण १००

केसगळती प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दाखल घेतली आहे. बाधित गावांमधील पाण्याचे नमुने परत घेऊन फेरतपासणी करण्याचे, तसेच रुग्णांची परत तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

– डॉ. दीपाली भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी, शेगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *