महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० जानेवारी ।। राज्यातील मत्स्य उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्या मत्स्य खात्याच्या वतीने ‘ॲक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल २०२५चे आयोजन केले आहे. पणजी येथील कंपाल येथील साग मैदानावर मत्स्यालय गॅलरीचे उद्घाटन मत्स्य उद्योग मंत्री निळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते झाले. यावेळी खात्याच्या संचालिका यशस्वीनी. बी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या ‘मत्स्य संपदा आणि नील क्रांती (ब्ल्यू रिव्ह्यूल्युशन) ला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासाठीच या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, रोजगार संधी, व्यावसायिक स्वरूप आदींची माहिती व्हावी आणि तरुणांनी या व्यवसायात सहभागी व्हावे, यासाठी खात्याच्या वतीने फिश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते संध्याकाळी होत आहे. तत्पूर्वी या महोत्सवातील मत्स्यालय गॅलरीचे उद्घाटन मंत्री हळर्णकर यांच्या हस्ते झाले. यावेळी नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली आहे. हा महोत्सव १२ जानेवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सुरू राहणार आहे. यावेळी विविध मार्गदर्शनाबरोबर, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य स्टॉल उपलब्ध असणार आहेत.