![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जानेवारी ।। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाडला आहे. कमाल आणि किमान तापमानात घट झाल्यामुळे थंडी पुन्हा वाढली. ग्रामीण भागात शेकोट्या पेटवण्यात येत आहेत. राज्यातील काही भागाचा पार १० अंशाच्या खाली घसरलाय. हवामान विभागाकडून राज्याचा वातावरण बदलण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. काही भागातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा वर्तवण्यात आलाय.
आगामी काही दिवसांत किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. धुळे, नाशिक, निफाड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी आणि महाराष्ट्राच्या इतर काही भागांमध्ये तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवलं गेलं होत. पहाटेच्या वेळी अनेक भागांत धुक्याची चादर आणि प्रचंड गारवा जाणवला.
अवकाळी पावसाचा अंदाज कोठे आहे?
राज्यातील अनेक भागांत तापमानात चढ-उतार होत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. हवामान विभागानुसार, उत्तर कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सध्या असलेली थंडी कमी होईल, आणि पुढील काही दिवसांत किमान तापमान दोन ते तीन अंशांनी वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. विदर्भातील हवामान पुढील पाच दिवस कोरडेच राहील, आणि थंडीचा जोर कायम राहणार आहे. इतर भागांमध्ये तापमानात वाढ होण्याबरोबरच हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
