2024 आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष! जागतिक तापमानात 1.5 अंश सेल्सियसची वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जानेवारी ।। 2025 या वर्षाची सुरुवात कडाक्याच्या थंडीने झाली आहे. जगात अनेक ठिकाणी बर्फवृष्टी होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर हिंदुस्थानातही थंडीचा कहर आहे. अशातच 2024 हे सर्वात उष्ण वर्ष ठरल्याची गंभीर बाब समोर आलीय. मागील वर्षात सरासरी जागतिक तापमान 1.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त नोंदवण्यात आलंय. ही पृथ्वीसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. युरोपमधील वातावरण बदलासाठी काम करणाऱया एजन्सीच्या म्हणजेच कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या अहवालानुसार, 2024 मधील जानेवारी ते जून यादरम्यानचा प्रत्येक महिना उष्ण होता. जुलै ते डिसेंबर (ऑगस्ट वगळता) 2023 नंतर 2024 हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय.

संपूर्ण वर्षात सरासरी जागतिक तापमान 1850-1900 च्या सरासरीपेक्षा 1.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त होते. कोपर्निकस शास्त्रज्ञांच्या मते, या वाढीचे परिणाम जागतिक हवामान आणि परिसंस्थांवर दीर्घकाळ जाणवतील. 2023 च्या तुलनेत कार्बन डायऑक्साइडची पातळी 2.9 भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) जास्त होती. जी 422 पीपीएमपर्यंत पोहोचली, तर मिथेनची पातळी 3 भाग प्रति अब्ज (पीपीबी) ने वाढून 1897 पीपीबीवर पोहोचली.

2024 चे सरासरी जागतिक तापमान 15.1 अंश सेल्सियस होते. जे 1991-2020 च्या सरासरीपेक्षा 0.72 अंश जास्त होते, तर 2023 च्या सरासरीपेक्षा 0.12 अंश जास्त होते. शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, 2024 मध्ये सरासरी तापमान 1850-1900 च्या बेसलाइनपेक्षा 1.6 अंश सेल्सियस जास्त ठरले.

हवामानावर काम करणारी एजन्सी कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने अहवालात म्हटले आहे की, हे पहिलेच वर्ष आहे ज्यामध्ये सरासरी जागतिक तापमान 1.5 अंश सेल्सियसपेक्षा जास्त राहिले. कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसची ही घोषणा हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांबद्दल सतर्क राहण्याचा इशारा देते.

कोपर्निकसच्या ताज्या अहवालानुसार, 2024 मध्ये अति उष्णता, भयावह पूरस्थिती, दुष्काळ आणि वणव्याच्या घटनांमध्ये वाढ होईल. उदाहरणार्थ, लॉस अँजलीस, कॅनडा आणि बोलिव्हियामधील जंगलातील आगींनी विक्रम मोडले आहेत. त्याच वेळी उच्च तापमान आणि आर्द्रतेमुळे तीव्र उष्णतेच्या परिस्थितीत वाढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *