महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जानेवारी ।। चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सीरिज तर तीन सामन्यांची वनडे सीरिज पार पडणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाला मिळालेल्या अपयशानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टीम सिलेक्टर अजित आगरकर यांची बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर 22 जानेवारी पासून इंग्लंड विरुद्ध सुरु होणाऱ्या टी 20 सीरिजसाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियातील खेळाडूंची यादी समोर आली आहे. यानुसार तब्बल 14 महिन्यांनी भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया आता इंग्लंडचा सामना करणार आहे. 22 जानेवारी रोजी इडन गार्डन येथे सीरिजचा पहिला सामना खेळवला जाणार आहे. शुक्रवारी बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या पराभवानंतर झालेल्या रिव्ह्यू मिटिंगमध्ये इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिजसाठी टीम इंडियात कोणत्या खेळाडूंना संधी देण्यात यावी यासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीतून टीम इंडियात संधी मिळालेल्या खेळाडूंची यादी समोर आलेली आहे.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार वर्षभरापासून दुखापतीने त्रस्त असलेल्या मोहम्मद शमीला इंग्लंड विरुद्ध टीम इंडियात संधी देण्यात आलेली आहे. तब्बल 14 महिन्यांपासून शमी टीम इंडियातून खेळलेला नाही. टीम इंडिया सोबत शेवटचा सामना शमीने वर्ल्ड कप 2023 फायनल खेळाला होता. त्यानंतर त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. इंग्लंड विरुद्ध टी 20 सीरिज करता विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतचा टीम इंडियात समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्या ऐवजी ध्रुव जुरेल आणि संजू सॅमसन याला संधी देण्यात आलेली आहे. तर मोहम्मद सिराज याला देखील डच्चू देण्यात आलंय. मात्र बीसीसीआयने अद्याप इंग्लड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी भारतीय संघाची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.
भारतीय संघ (इंग्लंड टी 20 सीरिज) :
संजू सॅमसन (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जूरेल (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरूण चक्रवर्थी, वॉशिंग्टन सुंदर
भारत विरूद्ध इंग्लंड टी 20 सीरिज वेळापत्रक :
22 जानेवारी : पहिला सामना, (इडन गार्डन, कोलकाता)
25 जानेवारी : दुसरा सामना, (एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई)
28 जानेवारी : तिसरा सामना, (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, राजकोट)
31 जानेवारी : चौथा सामना, (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे)
2 फेब्रुवारी : पाचवा सामना, (वानखेडे स्टेडियम, मुंबई)