महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जानेवारी ।। विधानसभा निवडणुकीनंतर अॅक्शनमोडवर आलेल्या राज्य सरकारने आता प्रवासी वाहतुकीमध्ये भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रिक्षा, टॅक्सी, एस.टी. तसेच इतर शहरांत धावणाऱ्या स्थानिक बसेसच्या दरात पंधरा टक्के वाढ केली जाणार आहे. या निर्णयामुळे रिक्षा व टॅक्सीच्या भाड्यात ३ ते ४ रुपये, तर बसच्या तिकिटदरात किमान १ ते ५ रुपयांची वाढ होणार आहे. ही भाडेवाढ येत्या महिन्याभरात किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच परिवहन विभागाचा आढावा घेतला. त्या बैठकीत टॅक्सी, रिक्षा, शहर बस सेवेच्या तिकीट दरासंदर्भातही निर्णय घेण्याबाबात निर्देश दिले होते. इंधनाच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात अनुक्रमे २ आणि ३ रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षांत प्रवासी भाड्यात वाढ झाली नसल्याने भाडेवाढ मिळावी, अशी संघटनांची मागणी आहे.
एस.टी. च्या महसुलात दिवसाला २ कोटींची भर
लालपरी सुरळीत धावत असल्याने एसटी महामंडळाने नोव्हेंबर २०२३ मध्ये शासनाकडे १२.३६ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने तो प्रस्ताव मान्य केला नाही. त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर २०२४ मध्ये १४.९५ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास प्रत्येक टप्प्यानुसार दरवाढ होऊन यामधून एसटीच्या महसुलात रोज २ कोटी रुपयांची भर पडणार आहे.