महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ जानेवारी ।। दुबईचं नाव घेतलं की पहिल्यांदा डोळ्यांसमोर गगनचुंबी इमारत बुर्ज खलिफा उभी राहते. ही इमारत ८२८ मीटर उंच असून १६३ मजल्यांची आहे. ही जगातील आतापर्यंतची सर्वात उंच वास्तू आहे. बुर्ज खलिफाचे बांधकाम २००४ मध्ये सुरू झाले आणि २०१० मध्ये पूर्ण झाले. म्हणजे ही इमारत बांधायला ६ वर्षे लागली. पण तुम्हाला माहित आहे का या सर्वात उंच इमारतीचा मालक कोण आहे? ही इमारत कोणी बांधली?
बुर्ज खलिफाचे खरे मालक एमार प्रॉपर्टीज आहेत, जी संयुक्त अरब अमिरातीची प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी आहे. एमार प्रॉपर्टीजचे अध्यक्ष मोहम्मद अल्बर आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात मोहम्मद अल्बर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
वास्तविक, बुर्ज खलिफा ३ कंपन्यांनी संयुक्तपणे बांधली होती. कारण या तिन्ही कंपन्या वेगवेगळ्या कौशल्यात निपुन आहेत. या तीन कंपन्यांच्या नावांमध्ये सॅमसंग सीट अँड टी, बेसिक्स आणि अरबटेक यांचा समावेश आहे.
सॅमसंग सीट अँड टी ही दक्षिण कोरियन कंपनी आहे, जी तिच्या प्रगत अभियांत्रिकी क्षमतांसाठी ओळखली जाते. टॉवरच्या डिझाइन आणि बांधकामात सॅमसंग C&T ने महत्त्वाची भूमिका बजावली.
तर बेसिक्स ही बेल्जियन कंपनी असून तिने बुर्ज खलिफा बांधण्यासाठी आपली तांत्रिक कौशल्ये आणि संसाधने वापरली. शेवटची अरबटेक ही संयुक्त अरब अमिरातची कंपनी आहे. अरबटेकने बांधकाम प्रक्रियेत योगदान दिले.
बुर्ज खलिफाचे वैशिष्ट म्हणजे जवळपास 95 किलोमीटर अंतरावरुनही ती दिसते. मानवी अभियांत्रिकी आणि डिझाइनचे हे एक उत्तम उदाहरण आहे. बुर्ज खलिफा ही केवळ एक इमारत नाही. हे दुबईच्या वेगवान प्रगतीचे प्रतीक आहे आणि जगासाठी प्रेरणास्तंभ आहे.