महागाईतून मिळाला दिलासा, आता EMI ची वेळ; यावेळी रेपो दरात कपात करणार का RBI?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जानेवारी ।। डिसेंबरमध्ये किरकोळ महागाई दर चार महिन्यांतील नीचांकी ५.२२ टक्क्यांवर आला आहे. महागाईवर आधारित कन्झुमर प्राईज इंडेक्स नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्के आणि डिसेंबर २०२३ मध्ये ५.६९ टक्के होता. किरकोळ महागाई कमी झाल्याने रिझर्व्ह बँक फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पतधोरण बैठकीत रेपो दरात कपातीची घोषणा करण्याची शक्यता आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसद्वारे (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नधान्याचा महागाई दर ८.३९ टक्क्यांवर आला आहे. नोव्हेंबरमध्ये तो ९.०४ टक्के आणि डिसेंबर २०२३ मध्ये ९.५३ टक्के होता.

रिझर्व्ह बँकेनं गेल्या महिन्यात चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी चलनवाढीचा अंदाज ४.५ टक्क्यांवरून ४.८ टक्क्यांवर नेला होता. अन्नधान्यांच्या किमतींवर दबाव आल्यानं ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत एकंदर महागाई वाढेल, अशी भीतीही रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली होती.

रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार डिसेंबरमध्ये भारताचा महागाई दर ५.३ टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. दरवाढ काहीशी कमी झाली असली तरी रॉयटर्सच्या एका वेगळ्या सर्वेक्षणानुसार किमान २०२६ च्या उत्तरार्धापर्यंत चलनवाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या चार टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता नाही.

आणखी घट होण्याची शक्यता
अन्नधान्याच्या किंमतींनी काही महिन्यांपासून महागाई दर अधिक ठेवला होता. ज्याचं प्रमुख कारण भाजीपाल्याच्या किंमती होत्या. मात्र, अनुकूल मान्सूनमुळे पिकांसाठी दिलासा मिळाला असून, येत्या काही महिन्यांत आणखी घट होण्याची आशा निर्माण झाली आहे.

फेब्रुवारीमध्ये व्याजदरात घट होण्याची शक्यता
किरकोळ महागाई कमी झाल्यानं रिझर्व्ह बँक फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात कपातीची घोषणा करू शकते. रेपो दरात कपात करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. मात्र, वाढत्या महागाईमुळे हा निर्णय रखडला आहे.

आता फेब्रुवारीमध्ये कर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दास यांच्या जागी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची नियुक्ती होण्यापूर्वी बहुतांश अर्थतज्ज्ञांनी गेल्या महिन्यात रॉयटर्सच्या सर्वेक्षणात रिझर्व्ह बँक ५ ते ७ फेब्रुवारीच्या धोरणात्मक बैठकीत प्रमुख व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात करून ६.२५ टक्के करू शकते असा अंदाज व्यक्त केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *