Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार? आदिती तटकरेंनी दिली महत्वाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १७ जानेवारी ।। विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना १५०० रुपये देण्यात येतात. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना १५०० रुपयांवरून पुन्हा महायुतीचं सरकार आल्यास २१०० रुपये वाढीव निधी देऊ अशी घोषणा केली होती. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं. मात्र, राज्य सरकारने अद्याप लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये वाढीव निधी देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे २१०० रुपये लाडक्या बहि‍णींना मिळणार की नाही? तसेच मिळणार असतील तर कधी? याबाबत वेगवेगळे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. यावरून विरोधकांनीही अनेकदा सवाल उपस्थित केले आहेत. दरम्यान, आता यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की नाही?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळणार की नाही? याबाबत भाष्य केलं आहे. आदिती तटकरे यांनी म्हटलं की, “आम्ही याबाबत आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. मात्र, तोपर्यंत तरी लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांचाच लाभ आपण देणार आहोत”, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

जानेवारीचा हप्ता कधी मिळणार?
“लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता आपण २५ डिसेंबर ते ३० डिसेंबर या दरम्यान दिला. आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता राज्य सरकार २६ जानेवारीच्या आधी वितरित करण्यास सुरुवात करेल. यासंदर्भात आर्थिक नियोजन आम्हाला अर्थखात्याकडून महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालं आहे. त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा लाडक्या बहि‍णींना लाभ देण्यास २६ जानेवारीच्या आधी सुरुवात करण्यात येणार आहे”, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

लाडक्या बहिणींना तूर्त दीड हजारच
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळवून देणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांना दिल्या जाणाऱ्या निधीत सध्या तरी कोणतीही वाढ होणार नसल्याचं आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वाढीव हप्त्यासाठी काही तरतूद राज्य सरकार करणार का? तसेच त्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा वाढीव हप्ता मिळणार का? हे अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *