![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जानेवारी ।। नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात रत्नागिरी तालुक्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात दाखल होत आहे. यंदा रत्नागिरीतून सर्वप्रथम हापूस पाठवण्याचा मान पावस महातवाडी येथील शकील उमर हरचिरकर व चांदेराई येथील रेहान जब्बार बंदरी यांनी मिळवला.
हरचिरकर यांनी हापूस आंब्याच्या दोन पेट्या मुंबईतील वाशी बाजारात, तर बंदरी यांनी सहा डझन आंबे गुजरातमधील अहमदाबाद येथे पाठवल्या आहेत. अहमदाबादमध्ये या आंब्यांना तब्बल २५ हजार रुपयांचा दर मिळाला.
हरचिरकरांनी चौथ्यांदा मारली बाजी
रत्नागिरी तालुक्यातून सर्वप्रथम हापूस आंबा पाठवण्याची ही हरचिरकर यांची चौथी वेळ आहे. पावस-महातवाडी येथील गोळप धनगरवाडी येथे हरचिरकर यांची आंब्याची बाग आहे. तेथे एक एकर जागेत त्यांची हापूस आंब्याची ४० झाडे आहेत.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून हरचिरकर स्वत: नियोजन करून हापूस आंब्याची काढणी करतात. सप्टेंबरमध्ये आलेला मोहोर टिकवण्यासाठी हरचिरकर यांनी तीन ते चार फवारण्या केल्या. त्यानंतर ऊन पडल्याने फळधारणा झाली. १६ जानेवारी रोजी या बागेतून दहा डझन आंबे काढण्यात आले.
या आंब्याच्या दोन पेट्या वाशी बाजारात शैलेश नलावडे यांच्याकडे विक्रीसाठी पाठवण्यात आल्या. शुक्रवारी (ता. १७) हे आंबे वाशीमध्ये पोचले. नलावडे यांच्या हस्ते हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीची पूजाही झाली.
बंदरी यांच्या बागेतील आंबा अहमदाबादला
रेहान जब्बार बंदरी यांची चांदेराई येथे बाग आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या बागेतील झाडांना मोहोर आला. पण त्यावेळी जोरदार पाऊसही सुरु होता. मोहोर वाचवण्यासाठी बंदरी यांनी आठ दिवसांनी फवारणी केली. ऑक्टोबरअखेरीस फळधारणा सुरु झाली. बंदरी यांच्या बागेतील आंबे गुरुवारी काढण्यात आले व गुजरातमध्ये पाठवण्यात आले.