महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ जानेवारी ।। ‘पुणे ते हुबळी’ आणि ‘पुणे ते कोल्हापूर’ या दोन वंदे भारत एक्स्प्रेस पुण्याहून सुटतात. वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास जलद गतीने होतो. पण या एक्स्प्रेस ट्रेनचे तिकीट काहींच्या आवाक्याबाहेर असते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसतील अशा अमृत भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरु झाले आहेत. पुण्यात लवकरच चार नव्या अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन धावणार असल्याचे म्हटले जात आहे.
रेल्वे मंत्रालयाने जुलै २०२३ मध्ये अहमदाबाद ते गांधीनगर अशी पहिली अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन लॉन्च केली होती. अमृत भारत एक्स्प्रेस ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनसारखीच असते. पण त्यात एसीची सोय नसते आणि त्याच्या तिकीटाचे दर तुलनेने कमी असतात. कमी खर्चात चांगल्या दर्जाच्या अमृत भारत एक्स्प्रेसला मिळालेल्या प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनाने पुण्याहून उत्तरेकडे जाण्यासाठी ४ अमृत भारत एक्स्प्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे रेल्वे प्रशासनाने अमृत भारत योजनेच्या अंतर्गत २० रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पातील बहुतांश काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यात पुणे ते दानापूर आणि पुणे ते छपरा या दोन गाड्या आणि हडपसर ते मुझफ्फरपूर आणि हडपसर ते पुरी या दोन गाड्या निश्चित करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे. यानुसार पुणे आणि हडपसर स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु झाले आहे.
पुणे ते कोल्हापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या सामान्य कोचमधील तिकीटाची किंमत १,१६० रुपये आणि उच्च श्रेणीतील तिकीटाची किंमत २,००५ रुपये इतकी आहे. यातुलनेमध्ये अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेनचे तिकीट कमी असणार आहे. ‘अमृत भारत योजनेच्या अंतर्गत पुण्यातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरु झाले आहे. अमृत भारत एक्स्प्रेसमधील डबे हे वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांप्रमाणे असणार आहेत. मार्गांबाबत रेल्वे बोर्ड आणि मंत्री चर्चा करत आहेत. पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने त्या मार्गांवर अमृत भारत एक्स्प्रेस सुरु केल्या जाणार आहेत’, असे पुणे रेल्वे विभागाचे प्रवक्ते रामपाल बारपग्गा यांनी म्हटले आहे.