चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ तारखेपर्यंत बदलू शकते टीम इंडिया ! अजूनही काही खेळाडूंना संधी ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२० जानेवारी ।। चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत आहेत. यातील सात संघांची घोषणा करण्यात आली आहे. यजमान देश पाकिस्तानचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही. आतापर्यंत ७ संघ जाहीर झाले असले तरी, एखाद्या संघाला आपले खेळाडू बदलण्याची मुभा असणार आहे. त्यामुळे काही खेळाडूंना संघात स्थान नाकारण्यात आले असले तरीही मधल्या काळात चमकदार कामगिरी करून त्यांना आपली दावेदारी सांगता येऊ शकेल.

‘या’ तारखेपर्यंत करता येणार संघात बदल

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना १९ फेब्रुवारीला होणार आहे. स्पर्धेसाठी सुमारे एका महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. सध्या जाहीर झालेले सर्व संघ हे प्राथमिक आहेत. महिन्याभराच्या कालावधीत खेळाडूंचा फिटनेस, दुखापती किंवा इतर वैयक्तिक कारणास्तव संघात बदल केले जाऊ शकतात. त्यामुळे संघातील खेळाडू बदलायचे असल्यास त्यासाठी १२ फेब्रुवारी ही अंतिम मुदत असणार आहे. स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा अगोदर संघ निश्चित करणे गरजेचे असणार आहे. त्यानंतर मात्र केवळ निवडलेल्या खेळाडूला दुखापत झाली तरच बदल केला जाऊ शकणार आहे.

जसप्रीत बुमराहचे काय?

स्पर्धेसाठी BCCI ने अतिशय मजबूत संघ निवडला असला तरी जसप्रीत बुमराहबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. जसप्रीत बुमराह सध्या पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. जसप्रीत बुमराहची इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी निवड झालेली नाही. पण शमीची मात्र निवड झालेली आहे. मोहम्मद शमी आता प्रदीर्घ दुखापतीतून बरा होऊन पुनरागमन करत आहे. या मालिकेत खेळून शमी त्याच्या फिटनेसची चाचणी देईल.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत आणि रवींद्र जाडेजा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *