तीन दिवस ‘या’ वेळेत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे महामार्ग बंद ; असे असतील पर्याय मार्ग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ जानेवारी ।। तुम्हीदेखील मुंबई आणि पुण्याला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुलाचे गर्डर उभारण्यासाठी 22 ते 24 जानेवारी या काळात दुपारी 12 ते 3 यावेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई लेनवर लोणावळा येथे डोंगरगाव/ कुसगांव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक ही जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून देहूरोड मार्गे वळविण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर डोंगरगाव आणि कुसगाव स्थानिक वाहतुकीसाठी उन्नत मार्ग उभारण्याचे काम केले जात आहे. त्यासाठी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहे. त्यामुळं 22 ते 24 जानेवारी दरम्यान जर तुम्ही या मार्गावरुन प्रवास करत असाल तर एकदा ब्लॉकची वेळ जाणून घ्याच.

वाहतुकीचा पर्यायी मार्ग कोणते?
दुपारी 12 ते 3 दरम्यान वळवण ते वरसोली टोल नाका येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमाक 48 येथून देहूरोड मार्गे वाहतूक पुण्याकडे वळवणार आहेत. दुपारी 3 नंतर ही वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ब्लॉक कालावधीनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र 9822498224 किंवा महामार्ग पोलिस विभागाच्या 9833498334 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असं अवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *