महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ जानेवारी ।। ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, संत वाङ्मयाचे प्रवाचक, अभ्यासक किसन महाराज साखरे यांचे निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कीर्तन, प्रवचन करणारे शेकडो विद्यार्थी त्यांनी घडविले आहेत.
चिंचवड येथील खासगी रुग्णालयात किसन महाराज साखरे यांचे निधन झाले. आज दुपारी आळंदी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांची तब्बेत बिघडली होती. त्यानंतर त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
आळंदी येथील साधकाश्रमात किसन महाराज यांनी संत साहित्य, तत्त्वज्ञान, व्याकरणशास्त्र याचे अध्ययन केले. प्रख्यात तत्त्वज्ञ एन. पी. मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे शिक्षण घेतले. १९६० साली साधकाश्रमाची धुरा किसन महाराजांच्या हाती आली. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी संत साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक आदी विद्यापीठात त्यांनी मार्गदर्शक म्हणून काम केले. विविध विद्यापीठांमध्ये पीएच.डी आणि डी.लिट पदवीच्या परीक्षक मंडळावर सदस्य म्हणून किसन महाराज यांनी काम केले. आकाशवाणी केंद्रावरून आयोजित होणाऱ्या कीर्तन स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथे आयोजित झालेल्या अखिल भारतीय किर्तनकार संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. ज्ञानेश्वरी वाचन मंदिर, रंगनाथ महाराज चॅरिटेबल ट्रस्ट अशा संस्थांचे विश्वस्त पद त्यांनी भूषविले. कीर्तन प्रवचनातून आध्यात्मिक उद्बोधन करतानाच हजारो लोकांना व्यसनमुक्त करण्याचे सामाजिक कार्य किसन महाराजांनी केले. श्री क्षेत्र आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली होती.