महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२१ जानेवारी ।। रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक नवा आणि प्रगत तंत्रज्ञान आधारित सेवा सादर केली आहे. जिओने VoNR (व्हॉईस ओव्हर न्यू रेडिओ) तंत्रज्ञान लाँच केले असून, हे तंत्रज्ञान वापरणारी भारतातील पहिली टेलिकॉम कंपनी ठरली आहे. जिओच्या या पावलाने एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया यांच्यासाठी मोठी स्पर्धा निर्माण केली आहे.
VoNR म्हणजे काय?
VoNR म्हणजे ‘व्हॉईस ओव्हर न्यू रेडिओ’, जे 5G तंत्रज्ञानावर आधारित प्रगत कॉलिंग सेवा आहे. सध्या बाजारातील बहुतेक टेलिकॉम कंपन्या VoLTE (व्हॉईस ओव्हर LTE) च्या साहाय्याने कॉलिंगची गुणवत्ता सुधारत असताना, जिओने पुढे जात 5G नेटवर्कच्या साहाय्याने VoNR सेवा सुरू केली आहे. (Jio VoNR Service)
VoNR तंत्रज्ञानामुळे कॉलिंगचा अनुभव आणखी प्रगत आणि दर्जेदार होतो. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास तुम्हाला HD दर्जाची ऑडिओ गुणवत्ता मिळेल, पार्श्वभूमीतील आवाज खूपच कमी होईल, आणि कमी लेटन्सीमुळे संवाद अधिक स्पष्ट व वेगवान होईल. शिवाय, या तंत्रज्ञानामुळे नेटवर्कची कार्यक्षमता वाढते आणि ग्राहकांना चांगला अनुभव मिळतो.
जिओ ग्राहकांसाठी विशेष
या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे जिओ SIM आणि 5G सक्षम डिव्हाइस असणे आवश्यक आहे. जिओचे हे नवे तंत्रज्ञान भारतातील डिजिटल क्रांतीसाठी मोठे पाऊल मानले जात आहे.
रिलायन्स जिओने ग्राहकांच्या सोयीसाठी आणि प्रगत सुविधांसाठी कायमच पुढाकार घेतला आहे. VoNR तंत्रज्ञानाच्या मदतीने जिओने पुन्हा एकदा स्पर्धेत मोठे अंतर निर्माण केले आहे.
स्पर्धक कंपन्यांसाठी धोक्याचा इशारा?
जिओच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला मोठी स्पर्धा मिळाली आहे. ग्राहकांना प्रगत कॉलिंगचा अनुभव देण्यासाठी या कंपन्यांनाही आता नवीन तंत्रज्ञानात गुंतवणूक करावी लागेल.