दावोसमध्ये जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी लोणचे, मसालेवाले, उदबत्तीवाल्यांशी करार केले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२३ जानेवारी ।। पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते पण अजूनही दोन हजार रोजगार देऊ शकले नाहीत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसला गेले आणि लोणचे, मसालेवाले, उदबत्तीवाल्यांशी करार केले असेही संजय राऊत म्हणाले.

आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात 16 हजार जरी रोजगार निर्माण झाले तरी त्यांचा मी जाहीर सत्कार करेन. नरेंद्र मोदी वर्षाला 2 कोटी रोजगार देणार होते पण अजूनही दोन हजार रोजगार देऊ शकले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशी गुंतवणूक आणायला गेले आणि करार कुणाशी तर बेडेकर लोणचे, कुबल लोणचे, ठाकूर लोणचे, मसालेवाले, उदबत्तीवाले. या देशातले उद्योगपती त्यांच्यांशी इथे करार होऊ शकतात. जिंदाल, रिलायन्स, पुण्याचे कल्याणी आहेत. यांच्याशी करार करायला दावोसला जाण्याची गरज काय आहे? दावोसला जाऊन एलन मस्कशी करार करायला पाहिजे, किंवा ज्या जागतिक कंपन्या आहेत, त्यांची नावं आम्हाला माहित नाही त्यांच्याशी करार करावेत. आमचे हृदय भरून येईल की. अॅपल, सॅमसंगचे प्रोजेक्ट महाराष्ट्रात यायला हवीत. दावोसला जाऊन हे करतात काय हे लवकरच सांगेन मी आता असेही संजय राऊत म्हणाले.

तसेच एकनाथ शिंदे आभार यात्रा काढणार आहेत. शिंदे काय ईव्हीएमचे आभार मानणार आहेत की पैशाच्या बंडलांचे आभार मानणार? हे त्यांना विचारा. एकनाथ शिंदे हे माणसाच्या उंचीएवढे ईव्हीएम यंत्र बनवले आहे. महाराष्ट्रात हे ईव्हीएम लावून त्याचे आभार मानत शिंदे ठिकठिकाणी फिरणार आहेत अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *