Union Budget नंतर बँकांना 5 दिवसांचा कार्यालयीन आठवडा? कामाच्या वेळाही बदलणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ जानेवारी ।। नोकरीच्या ठिकाणी कार्यालयीन आठवडा नमका किती दिवसांचा असावा यावरून अनेक मतभेद पाहायला मिळाले आहेत. विविध उद्योजक किंवा संस्था आणि अगदी कर्मचाऱ्यांनीही यावर आली मतं नोंदवली असून, या मतमतांतराच्या चर्चांनी कायमच लक्ष वेधण्याचं काम केलं आहे. इतकं, की आता केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासून देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळा आणि आठवडासुद्धा बदलणार का? हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नव्या निकषांच्या आधारे काम सुरू झाल्यास बँकांना सरसकट सर्व आठवड्यांमध्ये शनिवार रविवारी रजा दिली जाणार असून, कर्मचाऱ्यांना बँकांच्या शाखेमध्ये दर दिवशी 40 मिनिटं अधिक थांबून काम करावं लागणार आहे. सध्याच्या घडीला देशभरातील बँकांना पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी कार्यरत रहावं लागत असून, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी मात्र बँकांचं कामकाज बंद असतं. दरम्यान पाच दिवसांच्या कार्यालयीन आठवड्याच्या मुद्द्यावरून बँक कर्मचारी संघटना आणि रिझर्व्ह बँक यांच्या सरकारशी अनेकदा चर्चाही झाल्या आहेत. तेव्हा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये या मुद्द्यावर केंद्राकडून कोणता मोठा निर्णय घेतला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अर्थसंकल्पानंतर लागू होणार बदल?
अर्थसंकल्पानंतर देशात बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा कार्यालयीन आठवडा लागू होणार असून, शासनाकडे सातत्यानं महिन्याच्या 6 सुट्ट्यांऐवजी 8 सुट्ट्यांची मागणी केली जात आहे. या मुद्द्यावर कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यामध्ये एकमत झालं असलं तरीही सध्या हे संपूर्ण प्रकरण सरकार आणि आरबीआयकडे विचाराधीन असल्याचं म्हटलं जात आहे.

अखेरच्या टप्प्यात असणाऱ्या या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास बँक कर्मचाऱ्यांना कार्यालयीन आठवड्यामध्ये दर दिवशी 40 मिनिटं जास्त काम करावं लागणार आहे. ज्यामुळं बँक शाखा सकाळी 9.45 वाजता सुरू होतील. सध्या बँका सामान्यांसाठी 10 वाजता सुरू केल्या जातात. पण, या निर्णयानंतर मात्र ही वेळ बदलेल. तर, ज्या बँका सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असतात त्याच बँका हा निर्णय लागू झाल्यास 5.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यामुळे आता बँकांच्या कार्यालयीन आठवडा आणि वेळांसंदर्भात केंद्र शासनाकडून नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *