महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२४ जानेवारी ।। मुंबई ते पुणे प्रवास अधिक जलद व्हावा यासाठी मिसिंग लिंकचे काम वेगाने सुरू आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या जूनपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येऊ शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मिसिंग लिंकमुळं मुंबई ते पुणे मार्गाचे अंतर 13.3 किमीने कमी होणार आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव येथे 13.3 किमीच्या पर्यायी रस्ताचे काम एमएसआरडीसीकडून सोपवण्यात आले आहे. या रस्त्यावर लोणावळा येथून जाणाऱ्या खोपोली एक्झिटपासून ते सिंहगड इन्स्टिट्यूटपर्यंत असणाऱ्या 19.8 किमी अंतराच्या बोगद्यांचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.
जिथे मिसिंग लिंकचे काम सुरू आहे तो डोंगरभाग असून 130 मीटर उंचीच्या केबल पुलावर काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे काम पूर्णतः बंद करावे लागते. त्यामुळं यंदा पावसाळ्यात नागरिकांचा प्रवास सोप्पा होणार आहे.
मुंबई-पुणे मिसिंग लिंकमुळं लोणावळा घाटातील होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेने प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे उभारण्यात येतायत. त्यातील सर्वात मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किमी इतकी आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किमी लांबीचा आहे.
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. मिसींग लिंकमुळे मुंबई पुणे या शहरातील अंतर 6 किमी ने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा जवळपास 30 मिनीटांचा वेळ वाचणार आहे. डिसेंबर 2024 हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता. मात्र, नियोजीत वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. यामुळे आता हा प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली. जून 2025 मध्ये मुंबई-पुणे मिसिंग हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.