महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२५ जानेवारी ।। ‘‘दावोसमधून महाराष्ट्रात उद्योग आणल्याचा देखावा करण्यात आला आहे. काल जे करार झाले त्यापैकी अनेक कंपन्यांचे करार तीन वर्षांपूर्वी झाले होते. जिंदाल कंपनी ही महाराष्ट्रातील आहे. मात्र त्यांच्याशी करार दावोसमध्ये केला. त्यामुळे इथल्याच कंपन्यांना दावोसमध्ये नेऊन करार केल्याचे दिसते अशी टीका खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
पवार म्हणाले…
‘‘राज्याचा मुख्यमंत्री असताना मीदेखील दावोसला गेलो होतो. आपण आता ज्या पंचशील हॉटेलमध्ये बसलो आहोत, त्या हॉटेलचे मालक मागे उभे आहेत. त्यांच्या बंधूंनीदेखील एक करार केला आहे. त्यांनी तो करार दावोसमध्ये जाऊन केला असे समजते. याला फसवणूक म्हणता येणार नाही. मात्र ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांना महाराष्ट्रात एकत्र करायला पाहिजे होते.’’
उद्योगमंत्री उदय सामंत सत्तेतून बाहेर पडणार असल्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचा संदर्भ घेऊन राजकीय भूंकप होईल, असे वाटते काय यावर पवार म्हणाले, ‘‘मी तीच वाट पाहतोय. उद्योग मंत्री उदय सामंत हे दावोसमध्ये बसून बोलताना पाहिले. परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी ते दावोसला गेले होते की फोडाफोडी करायला गेले होते हे कळत नाही. काही खासदारांची छायाचित्रे मी पाहिली आहेत, पण ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून शिंदेंकडे जातील असे वाटत नाही.’’
संघर्षाला तयार रहा
नेर्ले (जि.सांगली) प्रतिसरकारच्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांची सत्ता खिळखिळी केली. आज पुन्हा एकदा हुकूमशाही सरकारविरोधात संघर्षासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन शरद पवार यांनी केले. कासेगाव (ता.वाळवा) येथे आयोजित क्रांतिवीर बाबूजी पाटणकर लोकशास्त्रीय संशोधन व प्रबोधन संस्थेचा ३९ वा वर्धापन दिन व क्रांतिवीर बाबूजी पाटणकर यांच्या ७३ व्या आठवण दिवसानिमित्त ते बोलत होते. ‘‘स्वातंत्र्यासाठी शेकडो क्रांतिकारकांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार उभे केले. संघर्षाचा तोच वसा डॉ.भारत पाटणकर पुढे नेत आहेत. धरणग्रस्त,बेघरांच्या मागे ते ताकदीने उभे आहेत.’’
पवारांनी हात उंचावला !
राज्यभरात लढायचे की शरण जायचे अशा द्विधा मनःस्थितीत राजकारणी आहेत असे भाष्य आमदार जयंत पाटील यांनी केले होते. त्याचा संदर्भ देत डॉ.भारत पाटणकर म्हणाले,‘‘ आपल्याला प्रस्थापितांविरोधात लढायचे आहे. हे दुहेरी आव्हान आहे. ते भांडवलदार आणि जातीयवादीही आहेत. आपल्याला त्यांच्याविरोधात लढायचे आहे की शरण जायचे आहे येथे ठरवावे लागेल. तुम्हीच हात वर करून सांगा लढायचे की नाही? ’’ डॉ.पाटणकर यांच्या या सवालावर प्रेक्षकांमधून हात वर येण्याआधीच मंचावरील शरद पवार यांनी क्षणात हात उंचावला.’’