” पुण्यासारख्या सुसंस्कृत नगरीमध्ये”हा आका कोण आहे?….. .”; व्हिडीओ दाखवत जितेंद्र आव्हाड संतापले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ जानेवारी ।। कोयता गँग आणि इतर टोळक्यांच्या गुन्हेगारीमुळे चर्चेत असलेल्या पुण्यात एक घटना घडली. अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने एका नागरिकाला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून महायुती सरकारला लक्ष्य केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ शेअर करत ‘या आकांना महाराष्ट्रात कोणी थांबवणार आहे की नाही’, असा संतप्त सवाल केला आहे.

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली. चांदेरे यांनी व्यक्तीच्या खांद्यावर हात टाकला आणि नंतर खाली आपटले. हा सगळा प्रकार एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर या प्रकरणी बाबुराव चांदेरे यांच्याविरोधात पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हा आका कोण आहे? जितेंद्र आव्हाडांचा सरकारला सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनेचा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “महाराष्ट्रातील ‘आका’ संस्कृती ही राजाश्रयामुळेच वाढीस लागली. आता हे बघा ना, खालच्या व्हिडिओमध्ये एक ‘आका’ पुण्यासारख्या सुसंस्कृत नगरीमध्ये एक वृद्ध गृहस्थाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतोय.”

“हा आका कोण आहे? या आकांना महाराष्ट्रात कोणी थांबवणार आहे की नाही की आका सत्तेची अशीच मुजोरी दाखवत राहणार?”, असे सवाल जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारला केले आहेत.

विजय कुंभारे यांनी मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे फोटो शेअर केले आहेत. चांदेरेंच्या मारहाणीत व्यक्तीच्या डोक्याला, पायाला जखम झाली आहे.

अजित पवारांनी झापले, ‘मी खपवून घेणार नाही’

दरम्यान, या घटनेबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, “मी ती क्लिप बघितली. हे अतिशय चुकीचं आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. मी त्याला सकाळी फोन केला होता. त्याने कॉल डायव्हर्ट केले होते. त्या मुलाला बोललो, तर मुलगा म्हणाला ते घरी नाहीत. मी त्या मुलाला बोललो की, जे घडलं ते मला अजिबात आवडलं नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने असे केलेले मी खपवून घेणार नाही. ज्याला कोणाला लागलं त्याने तक्रार दिली पाहिजे. तक्रार दिल्यावर कारवाई होणारच”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *