महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २७ जानेवारी ।। पाकिस्तानविरूद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजने जोरदार पुनरागमन केले आहे. पाकिस्तानने घरच्या मैदानावर अनुभवाचा फायदा उचलत पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केले होते. पण वेस्ट इंडिजने दुसरा सामना जिंकला आणि मालिका १-१ ने बरोबरी सुटली. मुल्तान येथे झालेला दुसरा कसोटी सामना वेस्ट इंडिजने १२० धावांनी जिंकला. या विजयासह विंडीजची ३४ वर्षांनी प्रतिक्षा संपली आहे. पाकिस्तानला घरच्या मैदानावर पराभूत करण्यात विंडीजला आज यश आले आहे.
विंडीजच्या या विजयात जोमेल वॅरिकनने ९ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानचा फिरकीपटू नोमान अलीने पाकिस्तानसाठी एकहाती झूंज दिली, त्याने दुसऱ्या सामन्यात एकूण १० घेतले. साजीद खानला देखील या सामन्यात ६ विकेट्स घेण्यात यश आले. पण फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही आणि पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने पहिल्या डावात १६३ धावा केल्या. त्यानंतर विंडीजने पाकिस्तानचा पहिला डाव १५४ धावांवर रोखत सामन्यात ९ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात विंडीजने चांगल्या फलंदाजीसह २४४ धावा उभारल्या. ज्यामध्ये कर्णधार क्रेग ब्रेथवेटने अर्धशतक झळकावले. पण पाकिस्तानला विजयसाठी २५४ धावांची आवश्यकता असताना त्यांचा डाव १३३ धावांवर रोखत सामना १२० धावांनी जिंकला.
३४ वर्षांनी जिंकला सामना
पाकिस्तान विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयाने वेस्ट इंडिजने आज ३४ वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. याआधी वेस्ट इंडिजने २३ नोव्हेंबर १९९० मध्ये पाकिस्तानला घरच्या मैदानावर पराभूत केले होते. फैझलाबाद मैदानावर ७ विकेट्सने वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला होता. या मालिकेत देखील पहिला सामना पाकिस्तान व दुसरा सामना वेस्ट इंडिजने जिंकला होता. तिसरा सामना अनिर्णित राहिल्यामुळे मालिका १-१ ने बरोबरीत सुटली होती.