Pune Crime : पुणे पोलीस आयुक्तांनी घेतलाय मोठा निर्णय ; टप्प्यात घेऊन गुन्हेगारांचा होणार कार्यक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जानेवारी ।। शहरातील रस्त्यांवर पोलिसांचे अस्तित्व वाढविण्यासाठी आणि पर्यायाने पुणेकरांना तातडीने मदत पुरविण्यासाठी शहर पोलिसांकडून ‘कॉप २४’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. (Pune Police Cop 24) त्यासाठी ७२६ पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच त्यांची सेवा सुरू होईल. हे पोलिस कर्मचारी २४ तास गस्त घालणार आहेत.

पुणे पोलिसांकडून ‘बीट मार्शल’ (Beat Marshal) ही संकल्पना गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन-दोन कर्मचारी दोन सत्रांत गस्त घालतात. रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करणे, एखादा गुन्हा घडल्यानंतर तत्काळ मदत करणे आणि समाजात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करणे आदी उद्देशांतून ‘बीट मार्शल’ ही संकल्पना राबविली जात होती. मात्र, सध्या ती ‘प्रभावहीन’ ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘कॉप २४’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

‘कॉप-२४’च्या माध्यमातून पोलिस शहरात गस्त घालणार असून, घटनास्थळी तत्काळ दाखल होणार आहेत. या कॉपना वेगळी वर्दी असणार आहे. गेल्या उपक्रमासाठी नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम प्रथम सुरू केला जाणार आहे. त्यानंतर त्याचे रूपांतर दैनंदिन कामकाजात केले जाणार आहे. स्थानिक पोलिसांचे बीट मार्शल बंद करून पूर्ण काळ ७२६ कर्मचारी दोन सत्रांमध्ये गस्त घालणार आहेत. पुणेकरांना मदत, गुन्हेगारीला चाप आणि पोलिसांचा अहोरात्र पहारा मिळणार आहे.

गुन्हे शाखेचे असेल नियंत्रण
‘सध्या कार्यरत असलेले पोलिस बीट मार्शल हे संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या अखत्यारित कार्यरत होते. त्यामुळे अनेकदा त्यांना गस्त घालण्याबरोबरच अन्य कामेही सांगितली जात होती. मात्र, ‘कॉप २४’मधील कर्मचारी हे गुन्हे शाखेच्या नियंत्रणाखाली काम करणार आहेत. त्यांना स्थानिक पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामे दिली जाणार नाहीत,’ असे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *