जगात कर्करोगानी मृत्यू मध्ये वाढ ; त्यातही फुफ्फुसाच्या कर्करोगाने होत आहे जास्त मृत्यू ; पण महाराष्ट्रात परिस्थिती वेगळीच !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ ऑगस्ट – पुणे – बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. त्याचा कर्करोग तिसऱ्या टप्प्यातला असल्याचे समजले असून तो लवकरच परदेशात उपचारांसाठी रवाना होणार असल्याची माहीती मिळत आहेत. मात्र केवळ सेलिब्रेटीच नाही तर सर्वसामान्य देखील या जीवघेण्या आजाराचे शिकार बनत असून जगात सर्वाधिक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगाने होत असल्याची माहिती ग्लोबोकॉनच्या-2018’च्या अहवालातुन समोर आली आहे.

कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत, यापैकीच एक म्हणजे फुफ्फुसाचा कर्करोग. कर्करोग होण्यामागील कारणे वेगवेगळी असू शकतात. कित्येकदा हा रोग अनुवांशिक कारणामुळेही होऊ शकतो. अभिनेता संजय दत्त याला फुफ्फुसाचा कर्करोग नेमक्या कोणत्या कारणांमुळे झाला आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, संजय दत्तची आई नर्गिस दत्त यांचाही मृत्यू कर्करोगामुळे झाला होता.
गेल्या काही वर्षांपासून जगात सर्वाधिक मृत्यू फुफ्फुसाच्या कर्करोगाने होतात. पूर्वी सर्वाधिक मृत्यू हे विविध आजारांच्या साथीने व्हायचे. मात्र, गेल्या पाच-सात वर्षात हे प्रमाण बदलले आहे. जगात सर्वाधिक मृत्यू हे कर्करोगाने व त्यातही फुफ्फुसाच्या कर्करोगाने होत आहेत. ‘ग्लोबोकॉनच्या-2018’च्या अहवालानुसार, जगभरात 2018 मध्ये 18.1 दशलक्ष नव्या कर्करोग रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 9.6 दशलक्ष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कर्करोगात सर्वाधिक प्रमाण म्हणजे 11.6 टक्के फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आहे. या रोगाच्या मृत्यूचे प्रमाणही सर्वाधिक, 18.4 टक्के आहे. त्याखालोखाल स्तन, हेड-अ‍ॅण्ड नेक, ओव्हरी, आतडे आणि यकृताच्या कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे.

महाराष्ट्रात वाढतोय तोंडाचा कर्करोग:

सिगारेट, हुक्का ,चिलीम यामुळे सध्या तोंडांचा कर्करोग वाढू लागला आहे. राज्यात 33 टक्के तोंडाचा , 28 टक्के स्तनाचा, 26 टक्के गर्भाशयाचा आणि 15 टक्के फुफुसाच्या कर्करोगाचे रुग्ण आढळतात असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्करोग रुग्णालय व संशोधन केंद्रातील कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर बी के शर्मा यांनी सांगितले.

धूम्रपान हे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण मानले जाते फुफ्फुसाच्या कॅन्सरने दगावणारे अंदाजे 80 टक्के रुग्ण हे धूम्रपान करणारेच असतात. सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण 15 ते 30 टक्क्यांहून अधिक असते.

धूम्रपान न करता केवळ धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून देखील कॅन्सरचा धोका कायम असतो. कारण धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात देखील थेट तंबाखूचा धूर जात असतो. एका सर्वेक्षणानुसार जगातील प्रत्येक चौथी व्यक्ती दुसऱ्याने केलेल्या धूम्रपानाचा बळी ठरत आहे.

धूम्रपानासोबतच वायू प्रदूषणामुळेही फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. वायू प्रदूषणातील सल्फेट, एअरोसाॅल फुफ्फुसावर वाईट परिणाम करतात. शिवाय चुलीवर जेवण बनवताना लाकडाचा धूर, गोवऱ्यांचा धूर यामुळेही फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. परंतु त्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. असे डॉ. बी के शर्मा यांनी सांगितले.

लक्षणे

श्वास घ्यायला कष्ट होणे.
खोकताना रक्तयुक्त खाकरा पडणे.
जुनाट खोकला.
छातीत घरघर होणे.
आवाज बदलणे.
छातीत वेदना होणे.
अशक्तपणा वाटणे व वजन कमी होणे.
अन्न गिळताना त्रास होणे.
हाताच्या बोटांच्या टोकाचा घेर बदलणे.

आजाराची कारणे

धुम्रपान करणे
रेडॉन वायू फुफ्फुसात जाणे
अ‍ॅजबेसटॉसची धूळ फुफ्फुसात जाणे
विषाणूंचा प्रादुर्भाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *