महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ ऑगस्ट – नवीदिल्ली – एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचे शैक्षणिक शुल्क आणि देणगी (डोनेशन) तसेच एवढ्याच रकमेचे दागिने, चैनीच्या वस्तू आणि पेंटिंग यांची खरेदी आता प्राप्तिकराच्या छाननीच्या (स्कॅनिंग) कक्षेत येणार आहे. याशिवाय बिझनेस क्लासचा देशांतर्गत तसेच विदेशी प्रवास तसेच २० हजार रुपयांवरील हॉटेलच्या बिलावरही प्राप्तिकर विभागाची नजर राहणार आहे. मोदी सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या एका ट्विटमधून ही माहिती समोर आली आहे.
कराची व्याप्ती वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा भाग म्हणून या पर्यायांवर सरकार विचार करीत आहे, असे सरकारने जारी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
प्राप्त माहितीनुसार, अधिकाधिक आर्थिक व्यवहार प्राप्तिकर विभागाला कळविण्याच्या कक्षेत आणले जात आहेत. याचाच अर्थ ठरावीक रकमेच्या वरील आर्थिक व्यवहारांची माहिती वित्तीय संस्था आणि इतर संस्थांकडून प्राप्तिकर विभागास कळविली जाईल. या माहितीच्या आधारे प्राप्तिकर विभाग अशा लोकांचा शोध घेईल, जे मोठी खरेदी करतात; पण कर देत नाहीत अथवा प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करीत नाहीत. कराधार व्यापक करण्याच्या उद्देशाने सरकारकडून ही पावले उचलली जात आहेत.
एक लाख रुपयांच्या वरील दागिने खरेदी तसेच एक लाखांवरील शैक्षणिक शुल्क आणि देणग्यांची (डोनेशन) छाननीही प्राप्तिकर विभाग करू शकेल. बिझनेस क्लासने केलेला देशांतर्गत विमान प्रवास तसेच विदेश प्रवासही प्राप्तिकरच्या कक्षेत आणण्यात येत आहे. इतकेच काय २० हजार रुपयांपेक्षा जास्तीचे हॉटेल बिलही प्राप्तिकरच्या कक्षात आणण्यावर विचार केला जात आहे.