Maharashtra Weather Update: राज्यात पुढचा आठवडा पावसाचा; पहा कोणत्या जिल्ह्यात कसं हवामान?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ जानेवारी ।। राज्यामध्ये तापमानाच्या पाऱ्यामध्ये चढ-उतार सुरूच आहे. राज्यातील थंडी कमी झाली असून उकाडा चांगलाच वाढला आहे. पण असे असताना देखील राज्यात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढचा आठवडाभर राज्यात ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात कुठे कसं हवामान राहिल हे आपण पाहणार आहोत…

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० दिवसांपासून किमान तापमानातील चढ -उतारासहित, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा २३ जिल्ह्यात माफकच थंडी जाणवली. तर कोकण, खान्देश, नाशिक, नगर, संभाजीनगर अशा १३ जिल्ह्यात मात्र थंडीचा प्रभाव विशेष जाणवला नाही. पुढील १० ते १२ दिवस म्हणजे ६ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमानात २ ते ३ डिग्रीने वाढ होऊन थंडी अजून कमी होण्याची शक्यता आहे. परंतु एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली असे नाही.

तर सध्या महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. मात्र पुढील आठवड्यात, १, २ आणि ५ फेब्रुवारी या २-३ दिवसामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ पावसाची शक्यता आहे. १ फेब्रुवारीला लातूर, नांदेड, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. २ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, बीड, जालना, अकोला, बुलडाणा, वर्धा, अमरावती, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. तर ५ फेब्रुवारीला लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात ही पावसाची शक्यता आहे.

सध्याच्या वातावरणीय प्रणाल्या बघता महाराष्ट्रात सध्या तरी गारपीटीची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस आणि गारपीट संबंधीची धास्ती बाळगू नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याची स्थिती जाणवत आहे.

शिवाय महाराष्ट्र किनारपट्टीवर अरबी समुद्रात पुन्हा दुसऱ्या असलेल्या लंब वर्तुळकार प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे विदर्भ मराठवाड्यासहित संपूर्ण उत्तर अर्ध महाराष्ट्रात आर्द्रता लोटली जात असल्यामुळे दमट वातावरण जाणवत आहे. हेच प्रत्यावर्ती चक्रीय वारे जेव्हा बंगालच्या उपसागारात स्थलांतरीत होण्याच्या शक्यतेमुळे आणि वेगाने पूर्वेकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्रातील वर स्पष्टीत जिल्ह्यात आणि परिसरात १,२, ५ फेब्रुवारीला ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *