महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जानेवारी ।। कॅन्सर हा आजार म्हटला की अनेकजण या नावानेच घाबरून जातात. मात्र आता मेडिकल सायन्स इतकं प्रगत झालं आहे की, यावर आधुनिक पद्धतीने उपचार आहेत. युरोपियन एजन्सी एका शोधाच्या जवळ आहे ज्याच्या मदतीने कॅन्सरवरील उपचार शक्य होणार आहे. ज्यामध्ये शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यातून कर्करोगाच्या पेशी काढून टाकल्या जाऊ शकतात.
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हामध्ये यावर काम सुरू आहे. जर हे काम यशस्वी झालं तर एक अल्ट्रा-फास्ट रेडिओथेरपी मशीन तयार केली जाणार आहे, जी एका सेकंदापेक्षा कमी वेळात कॅन्सरच्या पेशी नष्ट करणार आहे.
बीबीसीच्या अहवालानुसार, हे पारंपारिक रेडिओथेरपीपेक्षा खूप जलद उपचार आहे. यामध्ये एका सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. इतकंच नाही तर दुष्परिणामही अगदी किरकोळ असल्याचा दावा आहे. जिनिव्हा, स्वित्झर्लंडच्या बाहेरील CERN च्या मोठ्या प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ रेडिओथेरपी मशीनच्या नवीन पिढीच्या विकासाचं काम करत आहेत. या मशीनमुळे अत्यंत असाध्य ब्रेन ट्यूमर आणि शरीरात पसरलेल्या मेटास्टेसाइज्ड कॅन्सरवरही उपचार करणं शक्य होणार आहे, अशी अपेक्षा आहे.
सध्या, जेव्हा कॅन्सरच्या पेशी त्यांच्या जागेच्या पलीकडे जातात तेव्हा त्या आत खोलवर जातात आणि रेडिओथेरपी देखील त्यांना नष्ट करण्यात अपयशी ठरते. परंतु या नवीन रेडिओथेरपी मशीनमुळे असं होणार नाहीये.
उंदरामधील ट्यूमर झाला नष्ट
जिनिव्हा युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत मेरी कॅथरीन वोजेनिन यांच्या नेतृत्वाखाली एक स्टडी प्रकाशित करण्यात आलाय. ज्यामध्ये या शोधाला रेडिओथेरपीच्या जगात क्रांतिकारक बदल म्हटलं जातंय. या प्रयोगात, एका सेकंदापेक्षा कमी वेळात अल्ट्रा हाई डोज दराने उंदरांवर रेडिएशनची ठिणगी सोडण्यात आली. यानंतर असं दिसून आलं की, या उंदरामध्ये एक ट्यूमर होता, तो नष्ट झाला आणि त्याची जागा निरोगी टिश्यूंनी घेतली.