Steve Smith : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथची १ धाव अन् भीमपराक्रम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.  २९ जानेवारी ।। ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या कसोटीला आजपासून सुरूवात झाली. जॉश इंग्लिसला कसोटी पदार्पणाची संधी देण्यात आली. ट्रॅव्हिस हेड व उस्मान ख्वाजा या जोडीने सलामीला येऊन श्रीलंकेच्या गोलंदाजांना चोप दिला. हेडने आक्रमक फटकेबाजी करताना अर्धशतक पूर्ण केले, पाठोपाठ ख्वाजानेही अर्धशतक झळकावले. पण, स्टीव्ह स्मिथची एक धाव चर्चेत राहिली. 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हेडने पहिल्याच षटकात तीन चौकार खेचून इरादा स्पष्ट केला. त्याने ४० चेंडूंत १० चौकार व एक षटकाराच्या मदतीने ५७ धावा केल्या. प्रभात जयसूर्याने त्याची विकेट घेतली. पाठोपाठ जेफरी वंदेरसे याने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का देताना मार्नस लाबुशेनला ( २०) माघारी पाठवले. पण, त्यानंतर आलेल्या कर्णधार स्मिथने पहिली धाव घेतली आणि विक्रमाला गवसणी घातली. पहिल्या दिवसाचा लंच ब्रेक झाला तेव्हा स्मिथ २ धावांवर नाबाद आहे. ख्वाजानेही ९८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ६५ धावा केल्या आहेत.

स्मिथला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत भारताविरुद्ध हा पराक्रम करण्याची संधी होती, परंतु सिडनी कसोटीत एका धावेमुळे त्याला वाट पाहावी लागली. आज त्याने पहिली धाव घेतली आणि कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडला. ३५ वर्षीय स्मिथ हा कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा ऑस्ट्रेलियाचा पाचवा आणि जगातील १५ वा फलंदाज ठरला आहे. या धावा करताना त्याची सरासरी ही ५७.४० इतकी राहिली आहे. ऑस्ट्रेलियाकडून यापूर्वी अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ व रिकी पाँटिंग यांनी हा टप्पा ओलांडला आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत २ बाद १४५ धावा केल्या आहेत. कसोटीत किमान १० हजार धावा पूर्ण केल्यानंतर सर्वोत्तम सरासरी असलेल्या फलंदाजांमध्ये स्मिथने जॅक कॅलिस ( ५३.३७), सचिन तेंडुलकर ( ५३.७८) आणि ब्रायन लारा ( ५२.८८) या दिग्गजांना मागे टाकले. स्मिथच्या ( ५५.८६) पुढे कुमार संगकारा ( ५७.४०) हा अव्वल स्थानावर आहे.

याशिवाय सर्वात कमी इनिंग्जमध्ये १० हजार धावा करणाऱ्या अव्वल पाच फलंदाजांमध्ये स्मिथने २०५ डावांमध्ये हा टप्पा गाठला. या विक्रमात त्याच्यापुढे ब्रायन लारा ( १९५), सचिन तेंडुलकर ( १९५), कुमार संगकारा ( १९५) आणि रिकी पाँटिंग ( १९६) आहे. स्मिथने भारताचा महान फलंदाज राहुल द्रविडचा ( २०६) विक्रम आज मोडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *