‘…तर मी लगेच राजीनामा देईन’; पक्षाच्या बैठकीत अजित पवारांसमोरच धनंजय मुंडें म्हणाले …….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जानेवारी ।। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशीसंबंधित खंडणीच्या गुन्ह्याखाली मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड अटकेत असल्यापासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अगदी विरोधी पक्षातील नेते, आमदारांपासून ते सत्तेत मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांकडूनही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. असं असतानाच आता धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याची ऑफर दिली असून त्यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये आपली भूमिका मांडल्याचं वृत्त समोर येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पक्षाच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंनी आपल्या पक्ष सहकाऱ्यांसमोर राजीनाम्याच्या मागणीवर भूमिका मांडली.

पत्रकारांसमोर आक्रमक भूमिका…
मंगळवारी धनंजय मुंडेंनी पत्रकारांशी बोलताना आपण राजीनाम्यावर काहीही बोलणार नसल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच तुमच्यासमोर भूमिका मांडतील असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं. त्यानंतर पत्रकारांशी चर्चा करताना अजित पवारांनी कोणी दोषी असेल तर नक्कीच कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं सांगितलं होतं. मात्र काही संबंध नसताना कोणावरही कारवाई केली जाणार नसल्याचं सूचक विधानही यावेळेस अजित पवारांनी केलं होतं.

भाजपाचे आमदार सुरेश धसांकडून होणाऱ्या आरोपांवर बोलताना अजित पवारांनी आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी याबद्दल चर्चा करतो असं सांगितलं. सुरेश धस हे खालच्या स्तरातील कार्यकर्ते आहेत असं विधानही अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना केलं. मात्र पक्षाच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंनीच राजीनामा देण्याची ऑफर दिल्याची माहिती आता समोर येत आहे.

पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडें नेमकं काय म्हणाले?
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये धनंजय मुंडेंनी आपली भूमिका मांडताना राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. काल रात्री झालेल्या बैठकीत पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोरच मुंडे यांनी आपली भूमिका मांडली. “पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर मी लगेच राजीनामा देईन,” असं धनंजय मुंडे पक्षातील सहकाऱ्यांसमोर म्हणाले. तसेच, “तेच ठरवतील माझ्याविषयी काय करायचं,” असंही मुंडेंनी म्हटलं. तसेच याच बैठकीमध्ये मुंडेंनी, “काहीजण वैयक्तिक राग ठेवत आरोप करत आहेत,” असंही म्हटल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे. अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असंही यावेळेस धनंजय मुंडेंनी पक्षाच्या सहकाऱ्यासमोर सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *