Education News | शालेय पुस्तकांमधून वह्यांची पाने वगळली : शासनाचा निर्णय

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जानेवारी ।। विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी शालेय शिक्षण विभागाने दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबतच वह्यांची पाने देण्याचा निर्णय घेतला. तथापि, पुण्याच्या बालभारती संस्थेने घेतलेल्या आढाव्यात पुस्तकातील वह्यांच्या पानांचा अपेक्षित उपयोग केला जात नसून, विद्यार्थी पुस्तकांसोबत स्वतंत्रपणे वह्या घेऊन येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे योजनेचा हेतू सफल होत नसल्याने पूर्वीचा निर्णय रद्द करून शालेय शिक्षण विभागाकडून आता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून पूर्वीप्रमाणेच पुस्तके दिली जाणार आहेत.

राज्याचे तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ‘एक राज्य, एक गणवेश’ याबरोबरच पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या दप्तराच्या वाढत्या ओझ्यामुळे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम पाहता पाठीवरील दप्तराचे आझे कमी करण्यासाठी पुस्तकासोबत वह्यांची पाने देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०२३-२४ पासून इयत्ता २ री ते इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसोबत वह्यांची पाने असलेली पाठ्यपुस्तके देण्यात आली. योजनेचे यश लक्षात घेऊन त्याच्या पुढील वर्षी म्हणजेच २०२४-२५ वर्षीही ही योजना सुरू ठेवली. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती व अभ्यास संशोधन मंडळाने या योजनेचा फेरआढावा घेतला असता पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या अभ्यासाच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे वापर होत नसल्याचे दिसून आले. तसेच, विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्यादेखील घेऊन येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या योजनेचा हेतू सफल होत नसल्याचे बालभारतीने शालेय शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वीचा निर्णय रद्द केला. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षांपासून वह्यांच्या पानांशिवाय पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *