महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ फेब्रुवारी ।। Pune News Today: पुणे मेट्रोला बजेटमध्ये 837 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे पुणे मेट्रोच्या टप्पा 2 मधील कामे वेगाने होणार आहेत. टप्पा 2 मधील दोन नवीन मार्गिका आणि टप्पा 1 मधील 2 मार्गिकांच्या विस्ताराची कामे वेगाने होणार आहेत. यामुळे पुणेकरांना दिलासा मिळणार आहे.
महामेट्रोकडून टप्पा 1 मधील वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ही कामे पूर्ण झाली आहेत. आता पहिल्या टप्प्यातील मार्गिका विस्ताराची कामे महामेट्रो प्रशासनाने हाती घेतली आहेत. त्या कामांकरिता आणि केंद्रासमोर प्रस्तावित असलेल्या दोन प्रकल्पांसाठी महामेट्रो प्रशासनाने निधीची मागणी केली होती.
शनिवारी जाहीर झालेल्या बजेटमध्ये महामेट्रोच्या पुण्यातील कामांसाठी 837 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पुण्यातील मेट्रो मार्गिकांच्या विस्ताराला मोठा हातभार लागणार आहे.
837 कोटींत ही कामे होणार
पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रजपर्यंत एक्सटेन्शनची कामे पूर्ण होणार
केंद्राची मान्यता मिळाल्यावर रामवाडी ते वाघोली,
वनाज ते चांदणी चौक, खडकवासला ते खराडी या मार्गिकांची कामे पूर्ण होणार
आम्ही मागितला होता तेवढा पुरेसा निधी मिळाला आहे. या निधीतून दुसर्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. यामुळे पुणे शहरातील मेट्रो मार्गिकांचे जाळे आणखीनच विस्तारणार असून, याचा पुणेकरांना आरामदायी प्रवासासाठी फायदा होणार आहे.
– श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो