Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी राज्याच्या बजेटमध्ये काय असणार आहे खास ? अजित पवार म्हणाले …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ फेब्रुवारी ।। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यात विविध क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असून निर्मला सीतारामण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये सीतारामन यांनी अनेक निर्णय जाहीर केले.

देशाच्या अर्थसंकल्पानंतर आता महाराष्ट्रातील अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. अर्थ संकल्प कधी सादर होणार आणि लाडक्या बहिणींसोबत, युवा, शेतकरी, आणि सामान्य वर्गाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्पमार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार सांगितले आहे. यासोबतच शेतकरी आणि लाडक्या बहिणींचा विचार करून यांना डोळ्यासमोर ठेवून राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात तरूण-तरूणी, सर्वसामान्यांचा विचार होणार असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाआधी जनतेला संबोधित केले होते. अर्थसंकल्पामध्ये जनतेला दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.दरम्यान, महाराष्ट्रानंतर आता देशभरातही लाडकी बहीण योजना सुरु होणार का अशी चर्चा सध्या सुरु होती. कारण नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लक्ष्मीदेवीचं नाव घेतलं आहे. त्यामुळे देशभरात लाडकी बहीण योजना सुरु करणार का असा प्रश्न निर्माण झाला.

पंतप्रधान मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला, मी सुख-समृद्धीची देवी श्रीलक्ष्मीला नमन करतो. आणि अशा प्रसंगी, शतकानुशतके, आपण माता लक्ष्मीचे पवित्र नामस्मरण करत आलो आहोत. आई लक्ष्मी आपल्याला यश आणि बुद्धी देते, तसेच समृद्धी आणि कल्याण याची देखील शाश्वती देते. देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय समुदायावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहो अशी मी देवी लक्ष्मीला प्रार्थना करतो, असे म्हटले.

त्यामुळे लाडक्या बहिणींमुळे महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या यशाची केंद्रालाही भुरळ पडली असून देश स्तरावर ही योजना राबविण्याचा विचार असल्याचे संकेत यातून मिळत आहेत. मात्र सध्या तरी तशी घोषणा बजेटमध्ये करण्यात आलेली नाही. दरम्यान मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या बजेटमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता सुरु होण्याची घोषणा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *