![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३ फेब्रुवारी ।। : लग्नासाठी थाटलेला मांडव…. खास नवरा-नवरीसाठी सजवलेला भोवला आणि सजलेल्या लग्न मंडपातील सनई चौघड्याचे मंगल स्वर… अशा प्रसन्न आणि उत्साही वातावरणामध्ये रविवारी दुपारी १२ वाजता राज सुकुमार मदनाचा पुतळा अशा साक्षात श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात व भक्तिमय वातावरणात पार पडला. देवाच्या विवाह सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपुरात आले होते. भाविकांच्या गर्दीने मंदिर व परिसर अक्षरशः तुडुंब भरून गेला होता.
वसंत पंचमी या दिवशी साक्षात भगवंताचा रुक्मिणीबरोबर विवाह झाल्याची आख्यायिका रुक्मिणी स्वयंवर या कथेत आहे. या कथेनुसार आज साक्षात श्री विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा विठ्ठल मंदिरतील सभा मंडपात मोठ्या उत्साहात आणि थाटात पार पडला. दरम्यान, आज विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
आज दुपारी देवाची पाद्य पूजा झाली. त्यानंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते देवाला गुलाल लावण्यात आला. त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणीची उत्सवमूर्ती लग्न मंडपात आणली. दुपारी १२ वाजता देव ब्राह्मणांच्या साक्षीने हा विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी “या पंढरपुरात.. बाई वाजत गाजत… सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागलं… या पारंपारिक लोकगीतावर ठेका धरत आज हजारो भाविकांनी श्री विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचा “याची देही याची डोळा” पाहिला.
सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या उत्सवमूर्तीला वधू-वराप्रमाणे मौल्यवान पारंपारिक अलंकार आणि भरजरी पोशाख परिधान करून सजविण्यात आले होते. दुपारी १२ वाजता देवाच्या लग्नाची मंगल घटिका समीप आल्यानंतर श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मध्ये देव ब्राम्हणांनी अंतरपाट धरला. त्यानंतर सात मंगलाष्टका म्हणून देवाच्या अंगावर तांदूळ आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला. विवाह सोहळ्यानंतर देवाची आरती करण्यात आली. या नंतर पारंपारिक लोक गीतांवर ठेका धरत महिला भाविकांनी सभामंडपातच फेर धरुन आपला आनंद द्विगुणित केला. त्यानंतर वर्ऱ्हाडी भाविकांसाठी पंचपक्कवनांच्या जेवणाचा बेतही केला होता. सायंकाळी शोभायात्रेने विवाह सोहळ्याची सांगता झाली.
विवाह सोहळ्यासाठी मलेशिया, हॉलंडमधून फुले
देवाच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात विविध आकर्षक आणि पारंपारिक पाना-फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावर्षी प्रथमच सजावटीसाठी मलेशिया आणि हॉलंड या देशामधून ऍथोलियम, आर्किड, ट्यूलिप व स्ट्रॉबेरी रोज अशी वेगवेगळी महागडी फुले सजावटीसाठी आणली आहेत. पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी आकर्षक फुलांची सजावट केली. यामध्ये गुलाब, झेंडू, शेवंती, आष्टर, मोगरा, गुलछडी, बिजली, जरबेरा, कार्निनेश, घेडा पत्ती, सीतावेल, ग्लॅडिओ अशा विविध २० प्रकारच्या चार टन फुलांनी देवाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप, प्रवेशद्वार, नामदेव पायरी सजवली होती.या सजावटीसाठी सुमारे १५० कारागिरांनी दोन दिवस मेहनत घेतली. तर शुभ शकुणाचे प्रतीक असलेल्या ऊस आणि केळीची मंदिरात सजावट केली होती.
