महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ फेब्रुवारी।। शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील आरटीई प्रवेश प्रक्रियेत यंदा 1 लाख 9 हजार 111 जागांसाठी तब्बल 3 लाख 5 हजार 828 अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रवेशासाठीची लॉटरी पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार असून, साधारण 15 फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येतो. आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. यंदा राज्यभरातील 8 हजार 863 शाळांमध्ये प्रवेशासाठी 1 लाख 9 हजार 111 जागा उपलब्ध झाल्या आहेत.
या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी 14 ते 27 जानेवारीची पहिली मुदत, तर 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी अशी दुसरी मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत यंदा तब्बल 3 लाख 5 हजार 828 अर्ज प्राप्त झाले आहेत. अपेक्षित अर्ज आल्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ न देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
शिक्षण विभागाने यंदा पहिल्यांदाच आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रवेशासाठी शाळांची नोंदणी झाल्यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अवघ्या 19 दिवसांमध्ये तब्बल 3 लाखांहून अधिक पालकांनी त्यांच्या मुलांचे अर्ज भरले. दरवर्षी प्रवेश प्रक्रिया उशिरा सुरू होते.
परिणामी, ज्या मुलांचे प्रवेश आरटीईद्वारे होत नाहीत, त्यांना अन्य शाळांमध्ये देखील प्रवेश मिळणे अवघड होते. परंतु, यंदा 15 फेब्रुवारीपासूनच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्यामुळे जून-जुलैपर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल आणि ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश आरटीईद्वारे होणार नाहीत, त्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जून-जुलैपूर्वीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागासमोर राहणार आहे.
आरटीई प्रवेशाचे अर्ज भरण्यात ‘हे’ जिल्हे अग्रेसर
पुणे: 61 हजार 687
नागपूर: 29 हजार 939
नाशिक: 17 हजार 415
ठाणे: 25 हजार 850
छत्रपती संभाजीनगर: 16 हजार 819
आरटीई प्रवेशासाठी अपेक्षित अर्ज आल्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली नाही. आता प्रवेशासाठी आलेले दुबार अर्ज डिलीट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 6 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात प्रवेशासाठीची लॉटरी काढण्यात येईल. साधारण 15 फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.