महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि.५ फेब्रुवारी ।। राज्यात शुष्क कोरडे वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय झाले असून येत्या 5दिवसात हवामान कोरडे राहणार आहे. किमान व कमाल तापमानात येत्या दोन दिवसात फारसा फरक दिसणार नाही. पण त्यानंतर हळूहळू 2-3 अंशांनी तापमानवाढीला सुरुवात होईल असे भारतीय हवामान केंद्राने सांगितले आहे. महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी येत्या 3-4 दिवसांत कमाल तापमानात मोठी वाढ होणार आहे. कमाल तापमान 3-4 अंशांनी वाढेल अशी शक्यता आहे.गेल्या 3 दिवसांपासून विदर्भात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद होत आहे. (Maharashtra Weather Update)
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार,सध्या चक्राकार वाऱ्यांचा प्रवाह राजस्थान आणि त्यालगत मध्य पाकिस्तान भागात सक्रिय आहे. तर यापुढे पश्चिमी चक्रावात वायव्येस राहणार आहे. राज्यात येत्या दोन दिवसात तापमानात चढउतार राहणार आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. आता उन्हाचा चटका वाढला असून उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण होत आहेत. राज्यात सध्या हवामान कोरडे आहे. दिवसाचे तापमान चढ-उतार होत आहे, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णता अधिक जाणवत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सकाळी गारठा तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा कल असाच राहण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वात कमी तापमान 13.2°C नोंदवले गेले, आणि ते पुणे (लोनिकालभोर, हवेली) व सोलापूर (मोहोल केव्हीके) येथे होते. यानंतर 13.7°C तापमान पुणे (तळेगाव) येथे नोंदवले गेले. राज्यात सर्वाधिक तापमान 39.9°C होते, आणि ते नंदुरबार (शहादा AWS400) येथे नोंदवले गेले. त्यानंतर 38.9°C तापमान अकोला AMFU येथे नोंदवले गेले. 38.6°C तापमान सातारा (कराड) येथे, तर 38.5°C तापमान चंद्रपूर (टोंडापूर AWS400) येथे पाहायला मिळाले.
कोणत्या भागात कसे होते तापमान?
विदर्भ आणि मराठवाड्यात 35°C ते 39°C कमाल तापमानाची नोंद झाली.कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान तुलनेने कमी असले तरी आर्द्रताही होती. साधारण 27°C ते 34°C दरम्यान कमाल तापमान राहिले.नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर भागात रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली, त्यामुळे सकाळच्या वेळी गारठा जाणवला.मुंबई आणि किनारपट्टी भागात आर्द्रतेमुळे कमाल तापमान कमी असले तरी उष्णता आणि उकाडाच अधिक जाणवला.