खिशाला फटका ! १ एप्रिलपासून शालेय बसच्या भाडेदरात थेट १८ टक्क्यांनी वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि.५ फेब्रुवारी ।। राज्य परिवहन (एसटी) महामंडळ, रिक्षा-टॅक्सी पाठोपाठ आता विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या शालेय बससाठीही नागरिकांना अधिक रुपये मोजावे लागणार आहेत. ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’ने (एसबीओए) मुंबईसह राज्यात १८ टक्के दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून अर्थात १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे. दरम्यान, विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध वाहनांवर राज्य सरकारने बंदी घातल्यास भाडेवाढ होणार नाही, असेही ‘एसबीओए’ने स्पष्ट केले.

बस कंपनीकडून वाहनांच्या सुट्या भागांच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. इंधनदरातही वाढ झाली आहे. पार्किंग शुल्क दुप्पट झाल्याने बस चालक-मालकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. परिणामी बस देखभाल-दुरुस्ती खर्चात वर्षाला १२ टक्यांची वाढ झाली आहे. विद्यार्थी सुरक्षिततेसाठी जीपीएस यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सुरक्षा उपकरणे कार्यान्वित करणे अनिवार्य केले आहे. याच खर्चाचा भार बस चालक-मालकांच्या माथी मारण्यात आला आहे. यामुळे नव्या शैक्षणिक वर्षापासून १८ टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. दरवाढीची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह परिवहन विभाग आणि शाळांना देण्यात आली आहे.

… तर दरवाढ नाहीमुंबईसह राज्यात शालेय बसव्यतिरिक्त रिक्षा, टॅक्सींमधूनही विद्यार्थी वाहतूक केली जाते. ही वाहतूक बेकायदा आहे. राज्य सरकारने बेकायदा विद्यार्थी वाहतुकीला आळा घातल्यास दरवाढ रद्द करण्यात येईल, असे एसबीओएचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *