महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि.५ फेब्रुवारी ।। लाडकी बहिण योजनेच्या निकषांच्या आधारावर लाडकींचे अर्ज पुन्हा तपासले जातायत.गेल्या महिन्यातच फेरपडताळणीत अनेक लाडक्या अपात्र ठरल्यानंतर आता पुढच्या चौकशीसाठी अंगणवाडी सेविका थेट तुमच्या दारी येणार आहेत. पाहुयात याचसंदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहिण योजनेत लाखोंच्या संख्येनं नियमबाह्य लाडकींनी घुसखोरी केल्याचं उघड झालंय.
त्यामुळे आता अशा लाडकींचा थेट घरी जाऊन पंचनामा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. त्यामुळे आता थेट अंगणवाडी सेविकाच लाडकीच्या घरी धडक देणार आहेत. महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेत राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना ‘लाडक्या बहिणींच्या’ घरी जाऊन चारचाकी वाहन आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकांची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली आहे. ही यादी घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश डॉ. अनुप कुमार यादव यांनी दिले आहेत.
लाडकी बहीणचे निकष काय?
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असावं
कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा
चारचाकी गाडी असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी नसतील
संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ घेतलेला नसावा
लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65 च्या दरम्यान असावं
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पडताळणी न करता लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला होता का ? आणि आता जेव्हा सरकारी तिजोरीवर ताण वाढलाय तेव्हा सरकारला जाग आली का ? असे प्रश्न विरोधकांसह लाडक्याही विचारतायत. तुर्तास आता या चारचाकीच्या चाळणीत किती लाडक्या दोडक्या होणार याकडे सर्वांच लक्ष आहे.