मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करताय…तर ही बातमी पहिली वाचा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि.५ फेब्रुवारी ।। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गांपैकी एका भुयारी मार्गातून वाहतूक सुरू असली तरी येथील दोन्ही मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी अद्याप प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनी तरी हे काम पूर्णत्वाला जाईल, अशी अपेक्षा होती. त्यासाठी या कामाला गती देण्यात आली होती. मात्र, अद्याप हे काम अपूर्ण असल्याने बोगद्याची प्रतीक्षा कायम राहिली आहे.


पोलादपूर बाजूला कातळी भोगावच्या पुलावरील गर्डरच्या कामाचे क्युरिंग अपूर्ण आहे, म्हणजेच पिलर्स आणि गर्डर्स एकसंघ मिळून येण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी आवश्यक असल्याने या भुयारी मार्गातून वाहतूक सुरू होण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त टळला आहे. पहिल्या भुयारी मार्गातील काम पूर्णत्वास गेले असल्याने या मार्गातून दुहेरी वाहतूक सुरू झाली.

४५ मिनिटांचा कशेडी घाटातून वाहतुकीसाठी लागणारा वेळ आता अवघ्या ८-१० मिनिटांवर आला असल्याने तसेच कशेडी घाटातील अपघाताचे प्रमाणही घटले असल्याने वाहनचालकांकडून भुयारी मार्गातील वाहतुकीस प्रथम पसंती दिली जात आहे. मध्यंतरी कातळी भोगावपर्यंतच्या रस्त्यावरील पुलांवर गर्डर बसविण्याच्या कामानिमित्त भुयारी मार्गातून वाहतूक बंद करण्यात येऊन कशेडी घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली होती. दुसऱ्या भुयारी मार्गातील आतील भागातील भुयाराच्या दुतर्फा संरक्षक कठडे बांधण्याचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. प्रकाश झोताचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून दोन्ही भुयारांना जोडणारे चार भुयारी मार्ग अपूर्णावस्थेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *