माघी यात्रेसाठी चंद्रभागा नदीपात्रात पाणी सोडले, 240 क्युसेकने पाणी सोडले वारकऱ्यांमध्ये समाधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी ।। माघ शुद्ध एकादशी शनिवारी (दि. 8) साजरी होत आहे. याकरिता दिंड्या, वारकरी पंढरपूरच्या दिशेने मजल-दरमजल करत येत आहेत. यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते. श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यापूर्वी भाविक चंद्रभागा स्नान करतात. भाविकांना चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करता यावे. यासाठी दगडी पुलाजवळील बंधाऱ्यातून 240 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने व जास्त काळ पाणी साठून राहिल्याने पाण्यावर शेवाळे येऊन ते घाण झाले होते. उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी

तातडीने कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग व पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून गुरसाळे व नगर परिषदेच्या बंधाऱ्यातून तातडीने सहा दरवाजे उघडून नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याबाबत सूचना दिल्या. त्यानुसार आज चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. माघी यात्रेसाठी आलेल्या भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच नदीपात्रातील पाण्याचे रिसायकलिंग करून पाणी स्वच्छ करण्याची यंत्रणा बसविण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. सदरची यंत्रणा आषाढी यात्रेपूर्वी कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

चंद्रभागा नदीपात्रात केवळ यात्रा कालावधीतच पाणी सोडले जाते. नदीपात्राची स्वच्छता केली जाते. मात्र, इतरवेळी नदीपात्रात फाटकी कपडे, चप्पल, निर्माल्य यांचे ढीग तयार झालेले दिसून येतात. पाण्यावर शेवाळ तरंगते. त्यामुळे बहुतांश भाविक हे इच्छा असूनही, चंद्रभागेत स्नान करत नाहीत. त्यामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त केली जाते. पुंडलिक मंदिराजवळ बाराही महिने पाणी साचून राहावे, भाविकांना स्नान करता यावे यासाठी विष्णुपद येथे बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले आहे. हे पाणी बंधारा भरला की थोडेच दिवस राहते, नंतर हळूहळू कमी होत जाते. यातील पाणी शेतकरी मोटारी लावून शेतीसाठी पाणी उपसत आहेत. त्यामुळे हे पाणी कायमस्वरूपी टिकून राहात नाही, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *