![]()
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ फेब्रुवारी ।। राज्यातील उष्णतेचा तापमान कायम असून थंडीचा जोर ओसरला आहे. आता उन्हाच्या चटक्याने राज्यातील जनजीवन त्रस्त झाले आहे. उष्णतेची तीव्रता वाढू लागल्याने उकाडा जाणवत असून तापमानात वाढ होत असल्याचे स्पष्ट होत आहे. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोलापूर आणि परभणी येथेही तापमान ३५ अंशांपार गेले आहे. हवामान विभागाने आज कमाल आणि किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
राज्यात बहुतांश भागात किमान तापमान १४ ते २१ अंशांच्या दरम्यान आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, उर्वरित राज्यात थंडीचा जोर कमी झाल्याने वातावरणात उष्णतेचा प्रभाव जाणवत आहे. देशाच्या इतर भागांतही हवामानाचा तडाखा दिसून येत आहे.
वायव्य भारतात थंडीचा जोर कायम असून, राजस्थानमधील फतेहपूर येथे सपाट भूभागावरील नीचांकी २.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच, वायव्य भारतातील १२.६ किलोमीटर उंचीपर्यंत पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांचे १४० नॉट्स वेगाने वाहणारे प्रवाह अद्याप सक्रिय आहेत. राज्यात उन्हाच्या झळांमुळे अनेक ठिकाणी तापमान ३३ अंशांच्या पुढे गेले आहे.
सोलापूर, परभणी, ब्रह्मपुरीसह अनेक भागांत तापमान वाढले असून, उन्हाचा चटका जाणवत आहे. जनसामान्यांना घामाच्या धारांनी त्रास होऊ लागला आहे. थंडी ओसरल्यानंतर अचानक वाढलेला उकाडा नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये तापमान वाढण्याचा इशारा दिला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः उन्हाचा त्रास टाळण्यासाठी पाण्याचे प्रमाण वाढवणे आणि उन्हापासून संरक्षण घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
