महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ८ फेब्रुवारी ।। दिल्लीत भाजप सत्तेत येणार असं चित्र सध्या दिसत आहे. आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसची वाताहत झालीय. काँग्रेसला एका जागेवर आघाडी मिळालीय. इंडिया आघाडीच्या नेत्यांकडूनच काँग्रेसवर टीका केली जातेय. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी अजून लढा एकमेकांशी असं म्हणत टीकास्र सोडलंय. तर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही निशाणा साधला आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजपने बहुमताचा आकडा पार केल्याचं दिसतंय.
काय घडतंय?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं की, भाजपला हरवण्यासाठी आप आणि काँग्रेससुद्धा लढत आहे. पण वेगवेगळे लढत आहेत. जर ते एकत्र असते तर दिल्लीच्या निकालाच्या पहिल्या तासातच भाजपचा पराभव निश्चित झाला असता. काँग्रेसच्या स्थितीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, काँग्रसने खातं उघडलं. खातं उघडण्यासाठीच सगळे मैदानात उतरतात. त्यातून शिकायला पाहिजे.
पाच वर्षे केजरीवालांना काम करू दिलं नाही. नायब राज्यपालांच्या हाती ताककद दिली. केजरीवालांच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्याचाच हा परिणाम आहे. तुम्ही सर्वांना आत टाकाल आणि तुम्ही निवडणुका जिंकाल. महाराष्ट्रात हाच फॉर्म्युला झाला. दिल्लीत झाला. बिहारमध्येही दिसत आहे. महाराष्ट्रात मोठे नेते पिछाडीवर होते, ते पराभूत झाले. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. नेतृत्वाला संपवून टाका. त्यांचा पराभव करा हा पॅटर्न होता असंही राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विचार करावा. ते अजूनही राष्ट्रीय नेते झाले नाहीत. राहुल गांधी हे राष्ट्रीय नेते आहेत. तुम्ही बोगस मतदान करून जिंकलात आणि नेते झालात. राज्यात ३९ लाख मतदार वाढले, सगळी मते भाजपलाच कशी मिळाली? ही कोणती जादू? हे अघोरी कृत्य आहे? फडणवीसांनी हे सांगावं. एकनाथ शिंदेंकडे अघोरी विद्या आहे. जादू टोणा आहे. बोगस मतदान करता आणि आम्हाला ज्ञान देता अशा शब्दात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना सुनावलं.